भारतात नोकऱ्या आहेत, पण पगाराची समस्या; इन्फोसिसच्या माजी सीएफओंचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 05:44 PM2019-06-16T17:44:39+5:302019-06-16T17:44:47+5:30
भारतात चांगल्या नोकऱ्यांच्या संधी तयार होत नाहीत.
बंगळुरु : भारतात रोजगार निर्मितीवरून विरोधी पक्षांनी गेल्या निवडणुकीत मोदी सरकारवर टीकेची झोड उठविलेली होती. मात्र, इन्फोसिसचे माजी सीएफओ आणि गुंतवणूकदार टी. व्ही. मोहनदास पै यांनी भारतात नोकऱ्या नाही तर पगाराची समस्या असल्याचे म्हटले आहे. भारतात नोकऱ्या उपलब्ध आहेत. मात्र, कमी पगारामुळे पदवीधारक तयार नसल्याचे सांगत बेरोजगारीच्या आकड्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. भारतात चांगल्या नोकऱ्यांच्या संधी तयार होत नाहीत. 10 ते 15 हजार रुपयांच्या पगाराच्या नोकऱ्या अधिक आहेत. यामुळे पदवीधारक अशा नोकऱ्यांकडे आकर्षित होत नाहीत. भारतात मजुरीची समस्या आहे, कामाची नाही. तसेच देशामध्ये क्षेत्रिय आणि भौगोलिक समस्या असल्याचेही पै यांनी सांगितले.
पै यांनी यावर उपायही सुचविला आहे. भारतात चीनसारखे श्रम प्रधान उद्योग सुरु करावेत आणि बंदरांच्या जवळपास पायाभूत सुविधा बांधाव्यात. तसेच नोकरी करणाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च प्रतीच्या संशोधनामध्ये गुंतवमूक करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
चीनने हेच केले आहे. इलेक्ट्रॉनिक जोडणी आणि चीप बनविण्यासाठी त्यांनी संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. तसेच मोठमोठ्या कंपन्यांना त्या देशाने बोलावले होते. किनारी भागात पायाभूत सुविधा उभारल्या, आपल्याकडे या नीतीचा अभाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बेरोजगारीचे आकडे चुकीचे
पै यांनी सांगितले की, सीएमआयईने जारी केलेले 2018 मधील 1.10 कोटी लोकांची नोकरी गेल्याचे बेरोजगारीचे आकडे चुकीचे आहेत. 15 ते 29 वर्षीय नोकरदारांच्या सर्व्हेमध्ये खूप त्रुटी आहेत. ईपीएफओचा आकडा खरा आहे. ज्यामध्ये 60 ते 70 लाख लोकांना वर्षाला रोजगार मिळाला आहे.