यशाचे मापदंड नसतात - मोदी
By admin | Published: September 4, 2015 12:11 PM2015-09-04T12:11:08+5:302015-09-04T12:52:08+5:30
यशाचे कोणतेही मापदंड नसतात, तुम्ही सकारात्मक वृत्तीने स्वतःला कामात झोकून दिले तर हमखास यश मिळेलच असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमोर यशाचे गणित उलगडले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - यशाचे कोणतेही मापदंड नसतात, तुम्ही सकारात्मक वृत्तीने स्वतःला कामात झोकून दिले तर हमखास यश मिळेलच असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमोर यशाचे गणित उलगडले. पालकांनी त्यांची स्वप्नं मुलांवर लादू नये व मुलांच्या आवडीनिवडी जाणून घ्यावात असे आवाहनही मोदींनी केली आहे.
शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी दिल्लीतील माणेकशाँ सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी हीच शिक्षकांची खरी ओळख असून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आई-वडील व शिक्षकांचे मोलाचे योगदान असते, असे मोदींनी सांगितले. डॉक्टरने एका रुग्णाचे प्राण वाचवले तर त्याची बातमी येते, पण असे हजारो डॉक्टर, इंजिनिअर घडवणा-या शिक्षकांची कधीच बातमी येत नाही. पण आता शिक्षकांचे कौतुक करण्याची गरज आहे असे मोदींनी आवर्जून नमूद केले. आपल्याला फक्त रोबोट घडवायचे नाहीत, माणसांमध्ये संवेदवा असणे गरजेचे असते, या संवेदना कलेच्या माध्यमातून निर्माण होतात व म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहोत असे मोदींनी म्हटले आहे. भाषणानंतर मोदींनी विद्यार्थ्यांशी जवळपास दिड तास मनमोकळा संवाद साधला. राजकारणात येण्यासाठी काय करावे, देशसेवा कशी करता येईल, उत्तम वक्ता कसा होणार, कोणता खेळ खेळता अशी असंख्य प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारली. विशेष बाब म्हणजे मोदींनी या प्रश्नांवर मनमोकळी उत्तरं दिली.
> विद्यार्थ्यांनी विचारलेली प्रश्न व त्यावर मोदींनी दिलेली उत्तर
कोणता खेळ खेळायला आवडतो ?
मोदी - आम्ही राजकारणी काय खेळतो हे सर्वांनाच माहित आहे. मोदींच्या या उत्तरानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
> उत्तम वक्ता होण्यासाठी काय करावे ?
मोदी - उत्तम वक्ता होण्यासाठी तुम्ही उत्तम श्रोता होण्याची गरज आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमच्या आवडत्या क्षेत्राविषयीेचे वाचन करा. वाचनादरम्यान आवडलेल्या मुद्द्यांची नोट्स तयार केला. याचा वापर तुम्हाला भाषणात करता येईल. लोक काय बोलतील याचा विचार करण बंद करा. गुगल व यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जगभरातील उत्तम वक्त्यांची भाषण बघू शकता. यातूनही तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल.
> राजकारणात येण्यासाठी काय केले पाहिजे ?
मोदी - आपल्या देशात राजकारणाविषयी गैरसमज आहेत. पण बुद्धिवान, हुशार, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी राजकारणात सहभागी व्हायला पाहिजे. तरुण पिढीने राजकारणात तुम्हाला का यायचे आहे याचा विचार करावा. तुम्हाला जनतेची सेवा करायची आहे की फक्त निवडणूक जिंकायची आहे हे ठरवा.