देशात आता सव्वादोन लाखांहून कमी रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 05:49 AM2021-01-11T05:49:38+5:302021-01-11T05:50:04+5:30
बरे झाले एक कोटी ७५ हजार; मृत्युदरही घटला
नवी दिल्ली : देशात रविवारी कोरोनाचे १८,६४५ नवे रुग्ण आढळले व बरे होणाऱ्यांची संख्या अधिक म्हणजे १९,२९९ होती. कोरोनातून आजवर बरे झालेल्यांची एकूण संख्या एक कोटी ७५ हजार असून, त्यांचे प्रमाण ९६.४२ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्युदरात घट होऊन तो १.४४ टक्के झाला आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०४,५०,२८४ आहे, तर बरे झालेल्यांचा आकडा १,००,७५,९५० वर पोहोचला आहे. या संसर्गाने रविवारी आणखी २०१ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,५०,९९९ झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या २,२३,३३५ असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २.१४ टक्के आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नऊ कोटींपेक्षा अधिक झाली आहे.
लसीकरणात लाभार्थ्यांचा डेटा गोपनीय राहणार
नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरोधात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी सज्ज व्हा. तंत्रकुशल मनुष्यबळ व तंत्रज्ञान तयार राखा, असे आवाहन केंद्र सरकारने राज्य सरकारांना केले आहे. भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्युटच्या लसींना मान्यता मिळाल्यानंतर दिल्लीत दररोज बैठकांचे सत्र सुरू आहे. रविवारीदेखील राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. तंत्रज्ञान व माहिती व्यवस्थापन गटाचे अध्यक्ष रामसेवक शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. लस घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती संरक्षित ठेवण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला. लस घेणाऱ्यांचा डेटा सुरक्षित, संरक्षित व गोपनीय ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान राज्यांसमोर आहे.
पंतप्रधान मोदींची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नवी दिल्ली : देशभर कोरोना लसीकरण मोहीम शनिवारपासून सुरूवात होणार असून ती राबवण्याबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी सगळी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी साेमवारी दुपारी चार वाजता व्हर्च्युअली बैठक घेणार आहेत.