...म्हणून यंदा लोकसभेच्या निकालास विलंब होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:24 PM2019-05-08T12:24:45+5:302019-05-08T12:27:02+5:30
अंतिम निकाल येणार उशीर होणार असल्याची निवडणूक आयोगाची माहिती
नवी दिल्ली: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय होणार याची देशाला उत्सुकता देशाला आहे. त्यामुळेच अनेक जणांचं लक्ष 23 तारखेकडे लागलं आहे. मात्र यंदा अंतिम निकाल येण्यास उशीर होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. देशभरातील लोकसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्यास थोडा विलंब होईल. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या पडताळणीमुळे अंतिम निकाल उशिरा लागेल, असं आयोगानं सांगितलं आहे.
निवडणूक आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना निकालास उशीर लागणार असल्याचं सांगितलं. यंदा अंतिम निकाल जाहीर होण्यास 4-5 तासांचा उशीर होईल. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीमुळे हा विलंब होणार असल्याचं जैन म्हणाले. यंदा मतदानावेळी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्यामुळे मतदान केल्यावर मतदाराला एक पावती दिसली. त्यात मत कोणाला देण्यात आलं याची माहिती होती. ईव्हीएमबद्दलच्या तक्रारी येत असल्यानं व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्यामुळे यंदा मतमोजणी करताना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येईल.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या किमान पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी करण्याचे आदेश गेल्याच महिन्यात न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. हा आदेश आयोगानं मान्य केला. न्यायालयानं यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीत पाचपट वाढ केली आहे. प्रत्येक मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटची ईव्हीएमसोबत पडताळणी करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे. सध्या केवळ एका व्हीव्हीपॅटची ईव्हीएमसोबत पडताळणी केली जाते.