खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 08:08 AM2024-05-24T08:08:22+5:302024-05-24T08:08:57+5:30
आपचे निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय पक्षाच्या किमान चार राज्यसभा सदस्यांची विविध प्रकरणांत चौकशी सुरू आहे.
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्यांमागे ईडी, सीबीआय, आयकर विभाग एवढेच नाहीतर एनआयएच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याने पक्षाचे राज्यसभा सदस्य फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आपचे निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय पक्षाच्या किमान चार राज्यसभा सदस्यांची विविध प्रकरणांत चौकशी सुरू आहे.
पंजाब व दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू, आपचे राज्यसभा सदस्य हरभजन सिंग कुठेच दिसत नाहीत. प्रभावशाली व्यावसायिक आणि राज्यसभा सदस्य अशोक कुमार हे देखील निष्क्रिय आहेत. एवढेच नाहीतर आणखी एक राज्यसभा सदस्य विक्रमजीतसिंह साहनी हे देखील बहुतांश करून अदृष्य असतात. पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जात असल्याने ही नेते मंडळी नदारद रहात असल्याचे मानले जाते.
एकत्र ठेवण्याचे आव्हान
- आपचे राजकीय रणनीतीकार संदीप पाठक हे केजरीवाल यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत.
- चर्चा काहीही सुरू असल्या तरी बहुतांश राज्यसभा सदस्य निष्ठावान आहेत, असे पक्षाच्या एका सूत्राने सांगितले.
- आप अनेक आघाड्यांवर संघर्षाला सामोरा जात असून राज्यसभेत आपल्या सदस्यांना एकत्र ठेवण्याचे खडतर आव्हान त्याच्यासमोर आहे.