दिल्लीतील भाजप खासदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता, या तीन नेत्यांची उमेदवारी धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:20 PM2024-01-29T12:20:43+5:302024-01-29T12:21:35+5:30

Lok sabha Election 2024: दिल्लीतील भाजपच्या सात खासदारांपैकी किमान तिघांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे.

There is a possibility that the tickets of BJP MPs in Delhi will be cut | दिल्लीतील भाजप खासदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता, या तीन नेत्यांची उमेदवारी धोक्यात

दिल्लीतील भाजप खासदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता, या तीन नेत्यांची उमेदवारी धोक्यात

- हरीश गुुप्ता
नवी दिल्ली - दिल्लीतील भाजपच्या सात खासदारांपैकी किमान तिघांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार ४०० पार’चे विजयी समीकरण तयार करण्यासाठी पक्षनेतृत्व कसोशीने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून समाधानकारक कामगिरी नसलेल्या विद्यमान खासदारांना धक्का देण्याची तयारी सुरू आहे. भाजप मुख्यालयातून येत असलेल्या वृत्तांतील संकेत खरे मानल्यास देशभरातील २९० विद्यमान खासदारांपैकी किमान १५० जणांना तिकिटे गमवावी लागू शकतात. राजधानी दिल्लीत भाजप २०१४ पासून सातत्याने सातही जागा जिंकत आहे. पण, पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात तीन विद्यमान खासदारांविरुद्ध प्रतिकूल अहवाल आले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

२०२४ च्या विजयी समीकरणासाठी भाजप नेतृत्वाने अंतर्गत सर्वेक्षण सुरू केले असून, विद्यमान खासदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी स्वत:च्या पथकासह चार बाह्य  संस्थांची नियुक्ती केली आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, दिल्लीतील सातपैकी किमान तीन खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अंधुक आहे. अगदी चौथ्याचे भवितव्यही संशयाच्या  भोवऱ्यात आहे. 

पक्ष नेतृत्वाने निश्चित केलेल्या निकषानुसार, भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाने क्रिकेटपटू गौतम गंभीर, गायक हंसराज यांच्यावर असमाधानकारक कामगिरीचा शेरा मारला आहे. गौतम गंभीर हे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि हंसराज हे उत्कृष्ट गायक असले तरी त्यांना मतदारसंघातील कार्यकर्त्यांना समाधानी ठेवता आलेले नाही. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यावरही मतदारसंघातील कार्यकर्ते नाराज आहेत.  

आमच्या गरजेच्या वेळी अनेकदा त्यांचा तोल सुटतो, अशी तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. लेखी यांनी परराष्ट्र मंत्रालयाविरुद्ध नुकत्याच केलेल्या ट्विटने पक्षश्रेष्ठींच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे वृत्त आहे.

 डॉ. हर्षवर्धन यांचे मतदारसंघातील काम उत्कृष्ट असले आणि आरोग्यमंत्री म्हणून कोरोनाच्या काळात त्यांनी चांगले काम केले असले तरी त्यांना उमेदवारी दिली जाण्याबाबत अनिश्चितता  आहे.

Web Title: There is a possibility that the tickets of BJP MPs in Delhi will be cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.