"मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातही शिवलिंग, तिथेच व्हायला हवं खोदकाम’’, अखिलेश यादव यांचा योगींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 20:31 IST2024-12-29T20:30:56+5:302024-12-29T20:31:28+5:30
Akhilesh Yadav taunts Yogi Adityanath: संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानीही एक शिवलिंग आहे, तिथेही खोदकाम झालं पाहिजे, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे.

"मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातही शिवलिंग, तिथेच व्हायला हवं खोदकाम’’, अखिलेश यादव यांचा योगींना टोला
मागच्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी खोदकामातून जुन्या मूर्ती समोर आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून काही वादही निर्माण झाले आहेत. त्यावरून आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला टोला लगावला आहे. संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानीही एक शिवलिंग आहे, तिथेही खोदकाम झालं पाहिजे, अशी टिप्पणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
संभलसह अनेक जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या खोदकामाबाबत आज झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये विचारले असता अखिलेश यादव म्हणाले की, जेव्हापासून खोदकाम होत आहे त्यावरून मला आठवतंय की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्येही शिवलिंग आहे. तिथेही खोदकाम झालं पाहिजे. तिथल्या खोदकामासाठी आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे. २०२७ पर्यंत १.५ लाख एकर जमीन हवी आहे. ही जमीन २०२७ पर्यंत अधिग्रहित करायची आहे. असा दावा अखिलेख यादव यांनी केला आहे.
त्यांनी दावा केला की, हल्लीच उत्तर प्रदेश सरकारने इंग्रजी वर्तमानपत्राला जाहिरात दिली होती. त्यात उत्तर प्रदेशचा उल्लेख इकॉनॉमिक पॉवर हाऊस म्हटलं आहे. उद्यम प्रदेश बनवण्यासाठी सरकारकडे जमीन नाही आहे. मोठमोठ्या एमओयूवर सह्या झाल्या आहेत. त्यामध्ये सीडीआर रेश्यो वाढत नाही आहे. हे सरकार उधारीमध्ये सर्वात पुढे निघून जाईल. तसेच संपूर्ण खजिना रिकामी करूनच सत्तेमधून जाईल, असेही ते म्हणाले.