भारतात कोरोनाची भीती नाही; आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे मत, नियमांचे पालन करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 05:41 AM2022-12-26T05:41:23+5:302022-12-26T05:42:25+5:30
लोकांमध्ये विषाणूविरोधात पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाविरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती याआधीच निर्माण झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाच्या बीएफ.७ या विषाणूने जसे थैमान घातले तशी स्थिती भारतात उद्भवण्याची शक्यता नाही, असे सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलॅक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) या संस्थेचे संचालक विनय नंदीकुरी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भारतात कोरोनाची लाट येण्याबद्दल आताच ठोस विधान करणे शक्य नाही. मात्र, या लाट येण्याची चिन्हे दिसत नाहीत. विषाणू रोगप्रतिकार शक्तीपासून स्वत:चा बचाव करू शकतात, लस घेतलेल्यांना व ज्यांना याआधी ओमायक्रॉनचा संसर्ग झाला होता अशांना पुन्हा बाधा होऊ शकते ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे सर्व लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
डेल्टा विषाणूइतका बीएफ.७ घातक नाही
भारतामध्ये बीएफ.७ विषाणूंचे ४ रुग्ण नुकतेच आढळले. विनय नंदीकुरी म्हणाले की, सध्याचे विषाणू डेल्टा विषाणूंइतके घातक नाहीत. भारतात डेल्टामुळे मोठी लाट आली होती. देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. ओमायक्रॉनमुळे लाट आली तेव्हा लोकांना बूस्टर डोस दिले. इतक्या उपाययोजना केल्याने चीनसारखी स्थिती उद्भवणार नाही.
भारतामध्ये कोरोना चाचण्या व लसीकरण तसेच या आजारावरील उपचार या गोष्टींच्या सुविधा सर्वांसाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. - विनय नंदीकुरी, संचालक, सीसीएमबी
मास्क, सॅनिटायझर वापरा : पंतप्रधान
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, अटलबिहारी वाजपेयी आणि कोरोनाचे सावट अशा विविध विषयांना हात घालत पंतप्रधानांनी आपल्या ९६ व्या आणि या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’द्वारे रविवारी नागरिकांशी संवाद साधला. चीनमध्ये कोरोनामुळे दररोज हजारो लोकांचा बळी पडत आहेत. हे पाहता त्यांनी लोकांना कोरोनापासून बचावासाठी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले. आपण सर्वांनाच मास्क आणि सॅनिटाझरबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल. आपण सावध राहिलो तरच सुरक्षित राहू, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी वर्षभरात भारताने गाठलेले प्रगतीचे विविध टप्पेही अधोरेखित केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"