अशी कोणतीही वस्तू नाही, जी सूर्याला झेलू शकेल; आदित्य एल १ थोड्याच वेळात झेपावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 09:44 AM2023-09-02T09:44:15+5:302023-09-02T11:37:56+5:30
Aditya L1 Launch Latest Update: थोड्याच वेळात आदित्य एल १ सूर्याकडे झेपावणार; का? कशासाठी? कुठे पाहणार लाईव्ह प्रक्षेपण...
चंद्रमोहिम यशस्वी झाल्यानंतर आता इस्रो सूर्याकडे झेपावणार आहे. आदित्य एल-1ला घेऊन आज पीएसएलव्ही अवकाशात जाणार आहे. थोड्या वेळातच हे रॉकेट सोडले जाणार आहे. आदित्य एल-1 कशासाठी सूर्याकडे झेपावणार, कुठे लाईव्ह पाहता येणार आदी माहिती एकाच क्लिकवर देण्यात आली आहे.
पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ या अवकाशयानाला एल-१ बिंदूवर घेऊन जाईल. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. तर एल १ हा बिंदू 15 लाख किलोमीटरवर आहे. सूर्याविषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. इस्रोचे सूर्य मिशन सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे.
आदित्यचे लाँचिंग हे आज सकाळी 11:50 वाजता केले जाणार आहे. आदित्य-L1 चे लाईव्ह लॉन्चिंग थेट प्रक्षेपण 11:20 पासून सुरू होईल.
इथे पाहता येणार...
- इस्रोच्या वेबसाईट…isro.gov.in ला भेट देऊ शकता.
- तुम्ही फेसबुक पेजला देखील भेट देऊ शकता... Facebook.isro
- YouTube वर थेट पाहणे... youtube.com/watch?v=_IcgGYZTXQw
सूर्याच्या पृष्ठभागापासून थोडे वर म्हणजेच फोटोस्फियरचे तापमान सुमारे 5500 अंश सेल्सिअस असते. त्याच्या केंद्राचे कमाल तापमान 15 दशलक्ष अंश सेल्सिअस असते. अशा स्थितीत कोणतेही वाहन किंवा अंतराळयान तेथे जाणे शक्य नाही. सूर्याची उष्णता सहन करणारी कोणतीही वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाहीय. आदित्य एल१ हे सूर्यापासून अशा अंतरावर असणार आहे की ते सूर्याचे तेवढे तापमान झेलू शकणार आहे. तसेच आतील उपकरणे खराबही होणार नाहीएत.