देशासाठी 3 युद्ध लढलेल्या जवानाच्या गावात नाही रस्ता, लेकानं पाठिवरुन नेलं रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:50 PM2022-06-06T13:50:31+5:302022-06-06T13:53:02+5:30
देशासाठी 1962, 1965 आणि 1971 च्या लढाईत योगदान दिलेल्या विधी सिंह यांना रस्त्याअभावी मुलाच्या पाठिवर बसून रुग्णालयात जावे लागले
शिमला - देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशातील क्रांतिकारांप्रती आणि सैन्यदलाप्रति आदरपूर्वक नमन करुन आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. भारत जगात सर्वात शक्तिशाली, महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहात आहे. मात्र, आपल्याच देशात अद्यापही मुलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. देशासाठी तीन युद्धात छातीठोकपणे शत्रूराष्ट्रांचा सामना केलेल्या माजी सैनिकाला चक्क आपल्या मुलाच्या पाठिवर बसून गावातून रुग्णालयात जावे लागले.
देशासाठी 1962, 1965 आणि 1971 च्या लढाईत योगदान दिलेल्या विधी सिंह यांना रस्त्याअभावी मुलाच्या पाठिवर बसून रुग्णालयात जावे लागले. 85 वर्षीय विधि सिंह हे गलोड तहसिलच्या खोरड गावचे रहिवाशी आहेत. सिंह यांना निम्म्या रात्रीच लघवीचा त्रास आणि पोटदुखीमुळे रुग्णालयात न्यावे लागले. मात्र, गावात पक्क्या रस्त्याची सुविधा नसल्याने त्यांचा मुलगा दिपक याने वडिलांना पाठिवर घेऊन तब्बल अर्धा किलो मीटर पायपीट केली. अर्ध्या किमीनंतर पक्क्या रस्त्यावरुन त्यांना गाडीने रुग्णालयात नेण्यात आले.
विधि सिंह यांनी 1962 मध्ये चीनसोबत, 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तानसोबत युद्धात सहभाग घेतला होता. देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे आजही देशातील माजी सैनिकाला गावात पक्का रस्ता नसल्याने अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे, ही गंभीर आणि आपल्याला आरसा दाखवणारी गोष्ट आहे. ग्रामपंचायतीने तातडीचा रोड बनविण्याची मागणी केली होती. त्यासाठी, निधीही मंजूर करण्यात आला. यासंदर्भात मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतल्याचे विधि सिंह यांच्या पत्नीने सांगितले. मात्र, गावातील एका व्यक्तीने रस्त्यासंदर्भात न्यायालयात धाव घेतल्याने रस्त्याचा प्रश्न पुन्हा रखडल्याची माहिती रोशनीदेवी यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणाची जागेवर जाऊन पाहणी करुन तात्काळ प्रायोगिक तत्त्वावर रस्त्याचे काम हाती घेणार असल्याचं बीडीओ आकांक्षा शर्मा यांनी सांगितलं.