मतदारसंघातून होतोय विरोध; अमित शाह यांच्या भेटीनंतर नवनीत राणांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 16:52 IST2024-03-29T16:51:10+5:302024-03-29T16:52:49+5:30
नवनीत राणा यांनी अमरावतीत होत असेलल्या विरोधावर भाष्य करताना, सर्वांनी देशाच्या विकासासाठी मतभेद विसरुन मला पाठिंबा द्यावा, असे म्हटले होते.

मतदारसंघातून होतोय विरोध; अमित शाह यांच्या भेटीनंतर नवनीत राणांनी स्पष्टच सांगितलं
नवी दिल्ली - अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी भाजपाने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपातील स्थानिक नेत्यांनी आणि आता आमदार बच्चू कडू यांनीही राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. राणा यांची प्रहार संघटना आक्रमक झाली असून प्रहारने अमरावतीत ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बूब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे, नवनीत राणांचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे नवनीत राणा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, आज दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली.
नवनीत राणा यांनी अमरावतीत होत असेलल्या विरोधावर भाष्य करताना, सर्वांनी देशाच्या विकासासाठी मतभेद विसरुन मला पाठिंबा द्यावा, असे म्हटले होते. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर, आज राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही चर्चा केली. यावेळी, मी वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं राणा यांनी म्हटले.
आयुष्यात नवीन इनिंगची सुरुवात केली असून मी पक्षातील वडिलधाऱ्यांचा, आमच्या नेत्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आले आहे. अब की बार, ४०० पार हे मोदींचं जे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी अमरावतीकरांचीही साथ असले. ४०० जागांमध्ये अमरावतीचीही एक जागा असेल हा विश्वास देण्यासाठी मी इथे आल होते, असे नवनीत राणा यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर म्हटले.
देशात मोदींची मोठी लाट असतानाही अमरावतीकरांनी माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला साथ दिली होती. २०१९ मध्ये माझं लोकसभा क्षेत्रात शुन्य काम असतानाही मला निवडून दिलं होतं. येथील नागरिकांचा आवाज बनून गेल्या ५ वर्षात मी काम केलं आहे. आता, जे काही वरिष्ठ नेते माझ्याविरुद्ध उमेदवार देण्याचं बोलत आहेत, त्यांची समजूत काढायचं काम आमच्या महायुतीतील वरिष्ठ नेते करतील, असा विश्वासही नवनीत राणा यांनी शाह यांच्या भेटीनंतर व्यक्त केला.
#WATCH | Lok Sabha MP and BJP candidate from Amravati, Navneet Rana says, "I am starting a new innings in life and I was here to seek his (HM Amit Shah's) blessings. I conveyed to him on behalf of the people of Amravati that Amravati will definitely be one in PM Modi's dream of… pic.twitter.com/KqwMz1BICe
— ANI (@ANI) March 29, 2024
दरम्यान, नवनीत राणा यांनी यावेळी जात वैधता प्रमाणपत्राबाबतही भाष्य केलं. सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, त्यावर काही बोलणं उचित होणार नाही, मी वाट पाहातेय, आपणही वाट पाहा, असे राणा यांनी म्हटले.
प्रहार देणार उमेदवार
प्रहारचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावतीत संघटनेने उमेदवार उतरावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी दिली. अमरावतीत मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश बूब यांनी निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला. अमरावती लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी प्रहारचे उमेदवार असतील अशी घोषणा मी करतो, असेही पटेल यांनी सांगितले.