'पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची गरज भासू शकते'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 06:04 PM2019-06-10T18:04:38+5:302019-06-10T18:10:04+5:30
पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असं राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हं आहेत. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. यावरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप केले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.
पश्चिम बंगालमधील सद्यस्थितीची माहिती मोदी आणि शहांना दिल्याचं त्रिपाठींनी 'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज भासू शकते असंदेखील ते पुढे म्हणाले. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच कार्यकर्ते मृत्यूमुखी पडल्याचा दावा भाजपा नेतृत्त्वाकडून करण्यात आला. तर सहा कार्यकर्ते बेपत्ता झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसनं केला. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिघळली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. निवडणूक निकालानंतरही राज्यातील हिंसाचार थांबलेला नाही. निकालानंतरच्या हिंसाचारात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं त्रिपाठींनी सांगितलं. केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या सूचना राज्य सरकारकडून फेटाळण्यात आल्या आहेत. याबद्दलच्या प्रश्नावरदेखील त्रिपाठींनी भाष्य केलं. केंद्र सरकारला सूचना देण्याचा अधिकार आहे आणि त्या सूचना स्वीकाराच्या की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, असं राज्यपाल त्रिपाठी यांनी म्हटलं.