'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींनी दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 12:29 PM2018-01-10T12:29:38+5:302018-01-10T12:45:43+5:30
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' सिनेमात 300 कट्स सुचवल्याच्या वृत्ताला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी नकार दिला आहे.
मुंबई- संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' सिनेमात 300 कट्स सुचवल्याच्या वृत्ताला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी नकार दिला आहे. सिनेमात 300 कट्स सुचविले नसल्याचं प्रसून जोशी यांनी म्हंटलं. 'निर्मात्यांनी फक्त पाच बदलांसह पद्मावत सिनेमा जमा केला असून त्याला यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे' अशी माहिती प्रसून जोशींनी दिली.
'सल्लागार समितीच्या टिपण्या, सूचना आणि समाजाच्या भावना लक्षात घेण्याचा प्रयत्न केला आहे. सेन्सॉर बोर्डाला याबाबत आधीच माहिती देण्यात आली होती आणि सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे' असं प्रसून जोशी यांनी सांगितलं. सीबीएफसीची प्रक्रिया पूर्ण झाली असून 300 कट्स केल्याचं वृत्त चुकीचं असल्याचा दावा प्रसून जोशींनी केला आहे. सेन्सॉर बोर्डाला नाहक बदनाम केलं जात असल्याचंही जोशी म्हणाले.
'पद्मावत' सिनेमात दिल्ली, चित्तोड आणि मेवाडशी संबंधित सर्व संदर्भ हटवण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर सिनेमात 300 कट्स करण्यात आले, अशी माहिती समोर आली होती. पण सेन्सॉर बोर्डाने केवळ पाच बदल सुचवून यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे, असं प्रसून जोशी म्हणाले.
25 जानेवारी रोजी पद्मावती हा सिनेमा 'पद्मावत' या नावाने प्रदर्शित होणार आहे. पण राजस्थान सरकार हा सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्यावर ठाम आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 'पद्मावत' प्रदर्शित होऊ न देणार असल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे राजपूत संघटना करणी सेनेनेही 'पद्मावत' प्रदर्शित केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी धमकी दिली आहे.