मुलायम यांच्यासोबत समझोता नाही
By admin | Published: November 18, 2015 03:31 AM2015-11-18T03:31:23+5:302015-11-18T03:31:23+5:30
बिहारमध्ये महाआघाडीला मिळालेल्या भरघोस यशानंतर काँग्रेसने उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वातील बहुजन समाज पार्टीसोबत (बसपा) युतीसाठी चर्चा सुरू केली आहे;
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
बिहारमध्ये महाआघाडीला मिळालेल्या भरघोस यशानंतर काँग्रेसने उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वातील बहुजन समाज पार्टीसोबत (बसपा) युतीसाठी चर्चा सुरू केली आहे; परंतु मायावतींकडून मात्र अद्याप काँग्रेसला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळालेला नाही. मायावती यांच्या सोबत निवडणूकपूर्व युती झाली नाही, तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल. पण मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीसोबत कुठलाही समझोता करणार नाही, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि बसपा नेत्यांदरम्यान चर्चेच्या फेऱ्या अजूनही सुरू आहेत. मुलायमसिंग यांच्या राजकारणावर राहुल गांधी प्रचंड नाराज आहेत. मायावती यांच्यासोबत युती झाली नाही, तर काँग्रेस २०० जागांवर उमेदवार उभे करील, असेही संकेत मिळाले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस मुलायमसिंग यांना पूर्णपणे बाजूला सारण्याचा प्रयत्न करील, असाही सूत्रांचा दावा आहे.