पीएम होण्याची महत्त्वाकांक्षा नाही
By admin | Published: July 4, 2017 01:16 AM2017-07-04T01:16:20+5:302017-07-04T01:16:20+5:30
बिहारचे मुख्यमंत्री व जदयू प्रमुख नितीश कुमार यांची विरोधी ऐक्याच्या धडपडीवर सोमवारी कठोर टीका केली. ते म्हणाले की, प्रतिक्रियात्मक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री व जदयू प्रमुख नितीश कुमार यांची विरोधी ऐक्याच्या धडपडीवर सोमवारी कठोर टीका केली. ते म्हणाले की, प्रतिक्रियात्मक भूमिका घेऊन भाजपाला सशक्त पर्याय उभा होऊ शकणार नाही. यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यावा लागेल. पण त्यासाठी ध्येयधोरणे व दृष्टी बदलावी लागेल. पंतप्रधान होण्याची आपली क्षमता नाही व तशी आपली महत्वाकांक्षाही नाही. आमचा पक्ष खूप लहान आहे. त्यामुळे अशी मनिषा बाळगणे योग्यही होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नितीशकुमार म्हणाले की, विरोधकांकडे एक अजेंडा असायला हवा. तो सद्या नाही. नितीशकुमार व काँग्रेसच्या नेतृत्वात अलीकडच्या काळात मतभेद दिसून येत आहेत. पण, यामागचे नेमके कारण काय आहे ते नितीशकुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची यावेळी उपस्थिती होती.
नितीशकुमार म्हणाले की, आतार्यंत हे दिसून आले आहे की, ज्या व्यक्तीचे नाव चर्चेत असते त्याला हे पद कधीच मिळत नाही. भाजपला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या हितासाठी पर्यायी अजेंडा तयार करण्याची गरज आहे. २०१५ मध्ये बिहारमध्ये महाआघाडीने मिळविलेला विजय म्हणजे केवळ विरोधकांची एकी नव्हती तर
आमचा एक अजेंडा होता. तसेच आम्ही पूर्वी केलेली कामे होती. त्यामुळेच आम्ही यशस्वी झालो. २७ आॅगस्ट रोजी राजदच्या रॅलीबाबत अनौपचारिक निमंत्रण मिळाले आहे औपचारिक निमंत्रणही मिळेल, असेही ते म्हणाले.
अनेक मुद्दे दुर्लक्षित झाले आहेत
राष्ट्रपतीपदासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या स्थितीला त्यांनी प्रतिक्रियात्मक अजेंडा म्हणून संबोधले. तर, शेतकऱ्यांची दुर्दशा, गायींच्या सुरक्षेवरुन होत असलेला हिंसाचार हे मुद्दे दुर्लक्षित झाले आहेत, असेही ते म्हणाले.