पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षाच नाही
By admin | Published: February 5, 2017 12:51 AM2017-02-05T00:51:00+5:302017-02-05T00:51:00+5:30
राज्यातील भूमिकेबाबत मी समाधानी असून, पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षाच नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी सांगितले.
लखनौ : राज्यातील भूमिकेबाबत मी समाधानी असून, पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षाच नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी सांगितले. उत्तर प्रदेशातील माझ्या जबाबदारीबाबत मी समाधानी असून, देशाचा पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षा नाही, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. दिल्लीच्या बाहेर राहणारे लोक आनंदी असतात, असे त्यांनी गमतीत म्हटले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-सपा युतीला प्रचंड बहुमत मिळेल. ४०३ जागांपैकी ३०० जागा आम्ही जिंकू, असा दावा त्यांनी केला. सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लोकांपैकी ५० टक्के लोकांनीही माझ्या सरकारच्या बाजूने मत दिले, तर आम्हाला ३०० जागा मिळतील, असे सांगून ते म्हणाले. या योजनांतील काहींची माहिती देताना ते म्हणाले की, ५५ लाख महिलांना समाजवादी निवृत्तीवेतन मिळत आहे. १८ लाख लॅपटॉप वितरित करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच वैद्यकीयच्या जागा दुप्पट करण्यात आल्या. याशिवाय १०८, १००, १०९ या हेल्पलाईन सेवा तसेच कन्या विद्याधन योजना. गरिबांसाठी अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत.
वडील आणि सपाचे माजी प्रमुख मुलायमसिंह यादव यांना राजकीय लढाईत नामोहरम केल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, वडील आणि मुलगा या नात्यात कुठेही अंतर नाही. समाजवादी पार्टी आजही त्यांचीच आहे. सायकलही त्यांचीच आहे. नात्यात तसूभरही फरक पडलेला नसून, ते पूर्वीप्रमाणेत भक्कम आहे. वडील-मुलाचे नाते कोणीही बदलू शकणार नाही. समाजवादी पार्टीला इजा पोहोचवू पाहणाऱ्या लोकांपासून स्वत:ला दूर करण्यासाठी हे गरजेचे होते. ही बंडखोरी नाही. नेताजी पक्षात आम्हा सर्वांच्या वर आहेत. समाजवादी पार्टीला पुढे नेण्याची जबाबदारी आता पुढच्या पिढीवर आहे. तिकीटवाटपात तुमचा शब्द प्रमाण राहील, असे सांगितले गेल्यानंतरही तुम्ही मुलायमसिंह यांना पक्षाध्यक्षपदावरून का हटविले, असा प्रश्न केला असता मला केवळ १० आमदारांचा पाठिंबा मिळाला असता, तर ती माझी नाचक्की झाली असती. कुटुंबातील वादामागे कोण आहे या प्रश्नावर अखिलेख म्हणाले की, सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान साहब यांनी सपात दुफळी कोणी निर्माण केली हे स्पष्टपणे सांगितले आहे. (वृत्तसंस्था)
सपा जिंकल्यास नेताजींना आनंदच होईल
मुलायमसिंह युतीसाठी प्रचार करतील काय या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यात सत्ता कायम राखणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. सपा जिंकल्यास सर्वाधिक आनंद नेताजींनाच होईल.
सपाच्या दणदणीत यशामुळे नेताजींचाच आदर वाढणार आहे. आमच्या प्रचारमोहिमेत त्यांची छायाचित्रे आहेत. आमच्या प्रत्येक घोषवाक्यात त्यांचे नाव आहे. मी काँग्रेस-सपा युतीसाठी प्रचार करेन, असे नेताजींनी मला सांगितले आहे.