नन बलात्कारप्रकरणी सीबीआय चौकशी नाही
By Admin | Published: March 28, 2015 12:04 AM2015-03-28T00:04:49+5:302015-03-28T00:04:49+5:30
प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची राज्य सरकारने केलेली मागणी केंद्र सरकारने शुक्रवारी फेटाळली.
नवी दिल्ली : प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची राज्य सरकारने केलेली मागणी केंद्र सरकारने शुक्रवारी फेटाळली. देशभरात संताप आणि तीव्र निषेध झालेल्या या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा, अशी मागणी प. बंगाल सरकारने केली असून केंद्र सरकारने त्याबाबत असमर्थता या सरकारला कळविली असल्याचे गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १९ मार्च रोजी केंद्राकडे सीबीआय चौकशीची शिफारस केल्याचे घोषणा केली होती. राज्याकडून सीबीआयला सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. ननवर १४ मार्च रोजी सामूहिक बलात्कार करतानाच नराधमांनी लूटमारही केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१४ दिवसांची कोठडी
या प्रकरणातील दुसरा आरोपी गोपाल सरकार याला राणाघाटच्या स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावली आहे.