लक्षणे नसलेल्या बाधिताकडून संसर्ग होण्याची शक्यता नाहीच; जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:36 AM2020-06-10T07:36:33+5:302020-06-10T07:37:00+5:30
डब्ल्यूएचओच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली.
जिनेव्हा : कोविड-१९ च्या रोगाची कुठलीही लक्षणे न जाणवणारे रुग्ण जगात सर्वत्र आढळत आहेत. अशा व्यक्तींकडून आपल्यालाही संसर्ग होईल, या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, लक्षणे नसलेल्या बाधितांकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाहीच, असा ठाम निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे.
डब्ल्यूएचओच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली. सातत्याने रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे आपण सर्वांनी सातत्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. कोविड-१९ची लक्षणे न आढळणारी बाधित व्यक्ती तुमच्या संपर्कात आली असली तरी तिच्यापासून हा रोग होण्याची शक्यता नाही. दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमध्येच असे होऊ शकते.
मारिया वॅन केरकोव या जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन आजार तसेच पशूंपासून मानवाला होणाऱ्या आजार या विभागाच्या प्रमुख आहेत. त्या म्हणाल्या, अनेक देशांतील आजाराच लक्षणे नसलेल्या बाधितांचा आम्ही अभ्यास केला. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोविड-१९ संदर्भातील त्रास जाणवला नाही. या विषयावर तज्ज्ञ अभ्यास करीत आहेत.