केजरीवालांच्या नव्या कॅबिनेटमध्ये बदल नाही; जुन्याच मंत्र्यांनी घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 02:20 PM2020-02-16T14:20:57+5:302020-02-16T14:21:53+5:30
केजरीवाल यांच्यासहित 6 मंत्र्यांनी शपथ घेतली असून, ज्यात मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन, राजैन्द्र पाल गौतम यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात रविवारी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झालं. केजरीवाल यांच्यासोबत दिल्ली सरकारच्या ६ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. मात्र या नव्या मंत्रीमंडळात जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा जुनुच मंत्रीमंडळ पाहायला मिळालं.
दिल्ली विधानसभेत जुन्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली. आम आदमी पक्षाचे सर्व कॅबिनेटमंत्री दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी झाले आहेत. आपच्या नवीन मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या नव्या चेहऱ्यांमध्ये राघव चढ्ढा आणि आतिशी मार्लेना यांच्या नावांचा समावेश होता. मात्र आज झालेल्या शपथविधीत पुन्हा एकदा जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
केजरीवाल यांच्यासहित 6 मंत्र्यांनी शपथ घेतली असून, ज्यात मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन, राजैन्द्र पाल गौतम यांचा समावेश आहे. सिसोदिया यांच्याकडे गेल्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची जवाबदारी होती. तर 2015 मध्ये स्थापन झालेल्या केजरीवाल सरकारमध्ये सत्येंद्र जैन यांच्याकडे आरोग्य खात्याची जवाबदारी देण्यात आली होती.
त्याचबरोबर गोपाल राय यांना परिवहन, कैलाश गहलोत यांना गृहमंत्री आणि इतर महत्वाचे खाते, राजैन्द्र पाल गौतम यांनी पाणीपुरवठा आणि पर्यावरण सारखे खाते तर इमरान हुसैन यांच्याकडे अन्न पुरवठा मंत्री पदाची जवाबदारी देण्यात आली होती.