सीआयएसएफची सुरक्षा व्यवस्था नाही
By admin | Published: March 28, 2016 01:06 AM2016-03-28T01:06:46+5:302016-03-28T01:06:46+5:30
गेल्या पाच वर्षांत निधीअभावी किमान २७ महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत निधीअभावी किमान २७ महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सुरक्षा संस्थेकडे सुरक्षेची जबाबदारी सोपविणे विशेष मानले जाते. विशेषत: ब्रुसेल्सच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
एकूण विमानतळांपैकी २७ विमानतळांची सुरक्षा केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), भारतीय राखीव बटालियन्स (आयआरबी), राज्य पोलीस दलांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे खास नियुक्त केलेल्या सीआयएसएफला बाहेर ठेवण्यात आले.
वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने या वर्षाच्या प्रारंभी सादर केलेल्या अहवालात सुरक्षेच्या गंभीर बाबींकडे लक्ष वेधले.
विमानतळ सुरक्षेबाबत सध्या सीआयएसएफ हेच एकमेव खास सुरक्षा दल मानले जात असताना ८ अति संवेदनशील आणि १९ संवेदनशील विमानतळांची सुरक्षा या संस्थेकडे नसावी ही बाब चिंताजनक असल्याचे या समितीने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)