तीन वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचा एकही "डाग" नाही, अमेरिकेत मोदींचा "हुंकार"
By admin | Published: June 26, 2017 06:38 AM2017-06-26T06:38:28+5:302017-06-26T07:41:04+5:30
अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षात आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग...
Next
ऑनलाइन लोकमत
व्हर्जिनिया, दि. 26 - अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षात आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही "डाग" लागला नसल्याचं म्हटलं आहे. बहुचर्चित अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मोदींनी व्हर्जिनिया येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही "डाग" लागला नसल्याचं ठासून सांगितलं.
"भारतात भ्रष्टाचाराविषयी लोकांच्या मनात घृणा निर्माण झाली आहे. माझ्या सरकारवर आजपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. सरकारच्या कामकाज करण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने शासन चालवताना पारदर्शकता येत आहे, असं मोदी म्हणाले. यावेळी बोलताना मोदींनी आपल्या सरकारच्या कामकाजाचा पाढा येथील भारतीय वंशाच्या नागरीकांसमोर वाचला. देशातील अनेक श्रीमंतांनी गॅस सब्सिडी सोडली असून त्याचा गरिबांना फायदा होत असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला. ""दहशतवादाला प्रत्युत्तर देताना जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला त्यावेळी जगाला आमची ताकद काय आहे याची जाणीव झाली. आमच्या सर्जिकल स्ट्राइकवर कोणत्याही देशाने शंका उपस्थित केली नाही"" हे सांगतानाच त्यांनी पुढे पाकिस्तानला चिमटा काढला. अर्थात ज्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक झाली केवळ त्यांनीच प्रश्न विचारले असं मोदी पाकिस्तानचं नाव न घेता म्हणाले.
खरंतर इतर देशांनी सर्जिकल स्ट्राइकच्या आमच्या निर्णयावर टीका केली असती, जगभरातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असते, आम्हाला विचारणा करण्यात आली असती, पण भारताने इतकं मोठं पाऊल उचलून कोणी साधी शंकाही उपस्थित केली नाही, असं मोदी म्हणाले. आम्ही जगाला दहशतवाद समजवायचो तेव्हा कोणाला समजत नव्हतं, आज दहशतवादाने स्वतःच जगाला याबाबत समजावलंय, त्यामुळे आता संपूर्ण जगाला दहशतवाद समजला आहे, असं दहशतवादाबाबत बोलताना ते म्हणाले.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मोदींनी विशेष कौतूक केलं. सोशल मीडियाचा खरा उपयोग स्वराज यांनी करून दाखवला. तीन वर्षात परदेशांत अडकलेल्या 80 हजार भारतीयांची स्वराज यांनी सुटका केल्याचं मोदी म्हणाले.