देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड नाही- राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:31 AM2020-06-15T04:31:57+5:302020-06-15T04:32:11+5:30

भारत आता दुबळा राहिलेला नाही

There is no compromise with the countrys pride says Rajnath Singh | देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड नाही- राजनाथसिंह

देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड नाही- राजनाथसिंह

Next

नवी दिल्ली : चीनसोबतच्या पूर्व लडाख सीमेवर काहीसा तणाव निर्माण झाला असला तरी देशाच्या प्रतिष्ठेशी सरकार कदापि तडजोड करणार नाही, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिली व भारताची संरक्षण क्षमता वाढलेली असल्याने तो आता दुबळा राहिलेला नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

जम्मू-काश्मीरसाठी भाजपने आयोजित केलेल्या व्हिडिओ रॅलीमध्ये बोलताना राजनाथसिंह यांनी अशी खात्रीही दिली की, सीमेवरील परिस्थितीबाबत सरकार संसदेसह कोणालाही अंधारात ठेवणार नाही व योग्य वेळी सर्व माहिती दिली जाईल.

संरक्षणमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली जाणार नाही, याची मी खात्री देतो. भारताचे संरक्षणसामर्थ्य आता खूप वाढले आहे; पण हे समार्थ्य कोणालाही भीती दाखविण्यासाठी नाही तर स्वसंरक्षणासाठी आहे. 

राजनाथसिंह यांनी असेही सांगितले की, भारतासोबतचा सीमातंटा चर्चेतून सोडविण्याची चीनची इच्छा आहे. भारताचेही तसेच मत आहे. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर बोलणी सुरू आहेत.

राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला विशेष दर्जा रद्द केल्याने जम्मू-काश्मीरच्या चहूमुखी विकासाचे पर्व सुरू झाले आहे.
येत्या काही वर्षांत तेथे एवढा विकास होईल की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकही भारतात सामील होण्याची मागणी करू लागतील. तसे झाले की, पाकव्याप्त काश्मीरही भारताचा अविभाज्य भाग असल्याचा संसदेने केलेला नि:संदिग्ध ठराव सार्थक होईल.

पाकच्या गोळीबारात जवान शहीद, दोघे जखमी
श्रीनगर : पाकिस्तानच्या सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या पूंछ या सीमेवरील जिल्ह्यात रविवारी सीमेपलीकडून केलेल्या गोळीबारात व तोफगोळ्यांच्या माऱ्यात एक भारतीय जवान शहीद झाला, तर इतर दोघे जखमी झाले.
पूंछ जिल्ह्याच्या शाहपूर व केरनी या सीमेलगतच्या भागात पाकिस्तानने ही आगळीक करीत सैन्याच्या गस्ती चौक्यांवर तसेच गावांवरही मारा केला. सीमेवरील भारतीय सैन्यानेही यास जशास तसे चोख उत्तर दिले. या घटनेत जखमी झालेल्या तीन जवानांपैकी एकाचे नंतर इस्पितळात निधन झाले, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानच्या अशा प्रकारच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे या महिन्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत.
दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी भागातही पाकिस्तानने अशीच आगळीक केल्याने तेथेही दोन्ही सैन्यांमध्ये सीमेवर रविवारी दुपारी परस्परांवर गोळीबार सुरू होता, असेही प्रवक्ता म्हणाला.

Web Title: There is no compromise with the countrys pride says Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.