Tripura Violence: त्रिपुरात काहीच घडलं नाही, सोशल मीडियावर चुकीच्या अफवा; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 11:21 PM2021-11-13T23:21:24+5:302021-11-13T23:23:57+5:30
महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरु असल्याची माहिती मिळाली. त्रिपुराच्या घटनेवरुन महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केले गेले असं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.
नवी दिल्ली – गेल्या २ दिवसांपासून त्रिपुरा घटनेवरुन महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये हिंसक आंदोलन आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता या प्रकारावर केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. त्रिपुरामध्ये मस्जिदीला कुठल्याही प्रकारे नुकसान अथवा तोडफोड झाली नाही. सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या बातम्या चुकीच्या आणि बनावट आहेत. सोशल मीडियावरुन लोकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले आहे की, अलीकडे त्रिपुरामध्ये कुठलीही मस्जिद बांधकामाला नुकसान पोहचलं नाही. असा प्रकार समोर आला नाही. लोकांनी शांतता राखावी. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात काकराबन परिसरात एक मस्जिद पाडण्यात आल्याचं सांगितले. ही अफवा आणि चुकीची माहिती आहे. काकराबनच्या दरगाबाजार परिसरात मस्जिदीला नुकसान झालं नाही. गोमती जिल्ह्यात त्रिपुरा पोलीस शांतता ठेवण्याचं काम करत आहे असं त्यांनी सांगितले.
For instance, in Maharashtra, there have been reports of violence & unsavoury statements that are aimed at disturbing peace and harmony, based on fake news regarding Tripura. This is very concerning and it is urged that peace is maintained at all costs: Ministry of Home Affairs
— ANI (@ANI) November 13, 2021
तसेच महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरु असल्याची माहिती मिळाली. त्रिपुराच्या घटनेवरुन महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केले गेले. हे खूप चिंताजनक आहे. कुठल्याही परिस्थितीत शांतता राखायला हवी असं गृह मंत्रालायाने आग्रही सूचना केली आहे. महाराष्ट्रात अमरावतीसह नांदेड, मालेगाव ५ शहरात तोडफोड आणि दंगलसदृश परिस्थिती बनली आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला असून दंगल पसरवण्याविरोधात कारवाई केली जात आहे. CCTV फुटेजच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटवली जात आहे. आतापर्यंत १०० हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मालेगावात हिंसक आंदोलन करणाऱ्या १८ जणांना अटक केली आहे. तर नांदेडमध्ये ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अमरावतीत आतापर्यंत १० जणांना पकडलं आहे. अमरावती कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.
वाहने जाळली, दुकान, गॅरेजला लावली आग
बंद दरम्यान शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने शनिवारी उघडलीच नाही. नमुना भागात कार जाळण्यात आली, तर ऑटोगल्ली व हमालपुरा भागातील मोटर गॅरेजमधील चार दुचाकी जाळण्यात आल्या.