इंग्रज व केंद्र सरकारमध्ये काहीच फरक नाही - अण्णा हजारे
By admin | Published: February 23, 2015 01:33 PM2015-02-23T13:33:09+5:302015-02-23T13:33:28+5:30
शेतक-यांवर अन्याय करणारा भूसंपादन कायदा आणणा-या केंद्र सरकार व इंग्रजांमध्ये काहीच फरक नाही अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - शेतक-यांवर अन्याय करणारा भूसंपादन कायदा आणणा-या केंद्र सरकार व इंग्रजांमध्ये काहीच फरक नाही अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. भूसंपादनाविरोधात न्यायालयात न्याय मागण्याचा हक्क हिरावून घेत केंद्राने इंग्रजांप्रमाणेच हुकूमशाही सुरु केली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे भूमी अधिग्रहण वटहुकूमाविरोधात आंदोलनाला सुरुवात केली. मेधा पाटकर यांनीही अण्णांच्या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी अण्णांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भूमी अधिग्रहण कायदा आणून केंद्र सरकार शेतक-यांवर अन्याय करत आहे. केंद्रातील सत्ताबदलानंतर फक्त उद्योजकांचे अच्छे दिन आले असा टोलाही त्यांनी लगावला. जनतेची सेवा करण्यासाठी सत्ताधा-यांना निवडून दिले जाते, पण आता तेच सत्ताधारी जनतेला त्रास देत आहेत अशी नाराजीही अण्णांनी व्यक्त केली.