राफेलच्या किमतीवर आता चर्चा नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:07 PM2018-11-14T14:07:20+5:302018-11-14T16:23:06+5:30
फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती केंद्र सरकारनं सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती.
नवी दिल्ली- फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती केंद्र सरकारनं सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. त्यावर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयानं राफेलच्या किमतीवर सार्वजनिकरीत्या चर्चा करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राफेलच्या किमतीवर नव्हे, तर हवाई दलाला काय आवश्यक आहे, त्यावर चर्चा होऊ शकतेच. ज्यावेळी राफेलच्या विमानांच्या किमती सार्वजनिक केल्या जातील, तेव्हा या किमतीवर सार्वजनिक चर्चा होऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यानं या खंडपीठाकडे हे प्रकरण संवैधानिक पीठाकडे सोपवण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्ते वकील एम. एल. शर्मा म्हणाले, सरकारकडून सोपवण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये मे 2015नंतर घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये काही गंभीर घोटाळे झाल्याचं समोर आलं आहे.
Rafale Jet Deal Case: CJI Ranjan Gogoi says, any debate on pricing of the Rafale deal comes only if this Court decides those aspects needs to come in public domain.
— ANI (@ANI) November 14, 2018
पाच न्यायाधीशांचं खंडपीठानं या प्रकरणावर सुनावणी करावी, अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. आप नेते संजय सिंह यांच्या वकिलानं सांगितलं की, संसदेत 36 राफेल विमानांच्या किमतीचा खुलासा दोनदा करण्यात आला होता. त्यामुळे सरकारचा तर्कावर विश्वास ठेवू शकत नाही.
Rafale Jet Deal Case: AG KK Venugopal appearing for the Centre says, pricing details have been given in a sealed cover but there are factors like inter governmental agreement which barred its disclosure.
— ANI (@ANI) November 14, 2018
भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल विमान करारावरून भारतात केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडवला आहे. मात्र दुसरीकडे फ्रान्समध्ये भारताला देण्यात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. राफेल लढाऊ विमानांची फ्रान्समधील इस्तरे ली ट्यूब हवाई तळावरील चित्रफित समोर आली आहे. राफेल विमाने हवाई दलाच्या ताफ्यात आल्यावर भारताच्या हवाई दलाची क्षमता वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राफेल लढाऊ विमानांमध्ये असलेल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ही विमाने अन्य लढाऊ विमानांपेक्षा वेगळी ठरतात. दोन इंजिन असलेले हे विमान ताशी दोन हजार 130 किमी वेगाने उड्डाण करू शकते. तसेच या विमानांमधून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मारा करता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राफेल विमाने दूरच्या अंतरावरील लक्ष्यही सहजपणे भेदू शकतात. राफेल लढाऊ विमाने सुमारे 24 हजार 500 किलो वजन आपल्यासोबत वाहून नेण्यास सक्षम आहेत. तसेच अण्वस्त्र वाहून नेण्यातही सक्षम आहेत.