गोव्यात भाजपाचा संघाशी दुरावा नाही
By admin | Published: April 11, 2016 02:34 AM2016-04-11T02:34:55+5:302016-04-11T02:34:55+5:30
इंग्रजी माध्यमाच्या १३६ प्राथमिक शाळांना अनुदान चालूच ठेवण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी भाजपा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा एकदा
पणजी : इंग्रजी माध्यमाच्या १३६ प्राथमिक शाळांना अनुदान चालूच ठेवण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी भाजपा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट केले. दुसरीकडे, माध्यम प्रश्नावर संघाशी भाजपाचा कोणताही दुरावा नसल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले.
आगामी निवडणुकीत २६ जागा जिंकण्याचे ध्येय पक्षाने ठेवले आहे. त्यासाठी येत्या महिन्यापासून ‘घर चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. तेंडुलकर यांनी माध्यमप्रश्नी सरकार आणि भाजपाचीही भूमिका ठाम असल्याचे सांगितले. संघाशी दुरावा नाहीच, असा दावा करून ते म्हणाले की, भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या व्यासपीठावरून जे कोणी भाजपाविरोधात बोलत असतील आणि काही अंतर्गत वाद असेल, तर तो आपसात मिटवू. भारतीय सभा अथवा बैठकांना पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने तसेच मंत्री किंवा आमदाराने जाऊ नये, असे पक्षातर्फे स्पष्ट बजावले असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदींनी मार्गदर्शन केले. (प्र्रतिनिधी)