युपीत गेल्या दोन वर्षांत एकही दंगल नाही - योगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 05:22 AM2019-03-20T05:22:44+5:302019-03-20T05:28:34+5:30
आमच्या सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत एकही दंगल झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. या राज्याची माफियाराज अशी असलेली प्रतिमा माझ्या सरकारने बदलली
लखनऊ : आमच्या सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत एकही दंगल झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. या राज्याची माफियाराज अशी असलेली प्रतिमा माझ्या सरकारने बदलली असून राज्यातील कायदा, सुव्यवस्थेची उत्तम स्थिती ही इतरांसाठी आदर्श ठरली आहे असे ते मुलाखतीत म्हणाले.
सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कालावधीत केलेल्या कामांची माहिती देताना ते म्हणाले की, मी मार्च २०१७मध्ये सत्तासूत्रे स्वीकारण्याआधी उत्तर प्रदेशमध्ये कर्जाने दबलेले शेतकरी आत्महत्या करत होते. हे राज्य हत्या, लुटालूट व दंगली यांनी त्रस्त होते. सपा-बसपा यांच्या सरकारांच्या काळात राजकीय पाठबळ असल्याने माफिया सरकारी साधनांची लूट करत होते. त्यांनी अनेक घोटाळे केले. त्यामुळे कलंकित झालेली राज्याची प्रतिमा माझ्या सरकारच्या काळात सुधारली आहे.
दावे व वास्तवात अंतर - प्रियांका गांधी
उत्तर प्रदेशमधील आदित्यनाथ सरकारने राज्यातील परिस्थितीत सुधारणा करण्याचे जे दावे केले आहेत, त्यापेक्षा वास्तव वेगळे व भयानक आहे असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रयागराज ते वाराणसी या गंगायात्रेच्या दुसऱ्या दिवशी लोकांशी संवाद साधत होत्या.
गेल्या ७0 वर्षांत या देशात काहीच प्रगती झाली नाही अशी शेखी मिरविण्याचे दिवस आता लवकरच संपणार आहेत, असा टोलाही प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला.