दुष्काळामागे ग्रीन हाऊस गॅसेस नाही
By admin | Published: April 26, 2016 05:32 AM2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T05:32:18+5:30
हरितगृहातून उत्सर्जित वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) गोळा होऊन जगभरातील तापमानात वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : हरितगृहातून उत्सर्जित वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) गोळा होऊन जगभरातील तापमानात वाढ झाली आहे. त्यापासून भारतही सुटलेला नाही, तथापि महाराष्ट्रासह देशभरातील भीषण तापमान, दुष्काळ आणि अतिवृष्टी हा त्याचा परिणाम नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली आहे.
जागतिक तापमानात ०.६३ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाल्यामुळे देशभरातील बहुतांश भागातील तसेच सरासरी वार्षिक तापमान वाढले आहे. याउलट राजस्थान, गुजरात आणि बिहारच्या काही भागात तापमान किंचित घटलेही आहे. मुंबई, राजस्थान, उत्तराखंड आणि काश्मीरच्या काही भागात अतिवृष्टीचा बसलेला फटका अपवादात्मक म्हणता (स्थानविशेष) येईल. हवामान विभागाच्या अभ्यासानुसार त्याला भारतीय मान्सूनप्रणालीतील नैसर्गिक बदलाचा भाग मानले गेले. ताज्या अभ्यासात गेल्या ४० ते ५० वर्षांदरम्यान अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, मात्र वाढत्या जागतिक तापमानाशी त्याचा वैज्ञानिक आधारावर कोणताही संबंध असल्याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>केंद्र सरकारने विकास योजनांमध्ये पर्यावरणाला(इकॉलॉजी) सातत्याने प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जलवायू परिवर्तन कृतीयोजना(एनएपीसीसी) हाती घेतली असून त्या अनुषंगाने सर्व राज्यांनी कृती योजना आखली आहे.
याशिवाय बाराव्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय अनुकुलन (अॅडाप्टेशन) निधीसाठी प्रारंभीची रक्कम म्हणून ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या काळात प्राण आणि संपत्तीच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.