एक हजाराची नवी नोट आणण्याचा विचार नाही - शक्तिकांत दास
By admin | Published: February 22, 2017 11:17 AM2017-02-22T11:17:42+5:302017-02-22T12:05:08+5:30
1000 ची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नसल्याचं केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर चलनातून बाद करण्यात आलेली 1000 ची नवी नोट नव्या स्वरुपात व्यवहारात येणार असल्याच्या वृत्ताला केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी पुर्णविराम दिला आहे. 1000 ची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नसून 500 आणि कमी चलनाच्या नव्या नोटांची छपाई आणि पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
शक्तिकांत दास यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. '1000 ची नवी नोट बाजारात आणण्याचा कोणताही विचार नाही. सध्या 500 आणि कमी चलनाच्या नोटछपाईवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. एटीएममध्ये रोख नसल्याच्या तक्रारी आल्या असून त्याकडे लक्ष देत आहोत', असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी एटीएममधून गरज असेल तितकेच पैसे काढण्याचं आवाहन लोकांना केलं आहे.
No plans to introduce ₹1000 notes. Focus is on production and supply of ₹500 and lower denomination notes.
— Shaktikanta Das (@DasShaktikanta) February 22, 2017
Complaints of cash out in ATMs being addressed.Request everyone to draw the cash they actually require.Overdrawal by some deprives others.
— Shaktikanta Das (@DasShaktikanta) February 22, 2017
आरबीआयने एक हजार रुपयाच्या नव्या नोटांची छापाई सुरु केल्याच्या बातम्या येत होत्या. पुढच्या काही महिन्यांमध्ये एक हजार रुपयांची नोट चलनात आणली जाईल. तिचे स्वरूप आणि आकार बदललेला असेल. तसेच वेळोवेळी इतर नोटाही नव्या सिरिजमध्ये नवनव्या स्वरूपात चलनात आणल्या जातील असं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचे सांगितले होते. काळ्या पैशाला आळा बसण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे नोटाबंदीनंतर भाजपा सरकारकडून सांगण्यात आले होते. नोटाबंदीनंतर एटीएम आणि बँकेसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. तर रांगेमध्ये काही नागरिकांचा बळी गेला होता.