पत्नीच्या नावे मालमत्ता केल्यास प्राप्तिकर लाभ नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:20 AM2018-12-14T05:20:20+5:302018-12-14T06:25:13+5:30
फ्लॅट अथवा कुठलीही स्थावर मालमत्ता विकल्यानंतर तो पैसा दोन वर्षांत दुसऱ्या मालमत्तेमध्ये गुंतविल्यास प्राप्तिकरात सवलत मिळते. पण ही दुसरी मालमत्ता केवळ पत्नीच्या नावे केल्यास प्राप्तिकराच्या या सवलतीचा लाभ मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश प्राप्तिकर लवादाने एका प्रकरणात दिला आहे.
मुंबई : फ्लॅट अथवा कुठलीही स्थावर मालमत्ता विकल्यानंतर तो पैसा दोन वर्षांत दुसऱ्या मालमत्तेमध्ये गुंतविल्यास प्राप्तिकरात सवलत मिळते. पण ही दुसरी मालमत्ता केवळ पत्नीच्या नावे केल्यास प्राप्तिकराच्या या सवलतीचा लाभ मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश प्राप्तिकर लवादाने एका प्रकरणात दिला आहे.
प्राप्तिकर कायद्याच्या दीर्घकालीन भांडवली नफ्याशी (एलटीसीजी) संबंधित कलम ५४ नुसार, मालमत्तेच्या विक्रीत नफा झाल्यास व तो नफा दोन वर्षे अन्य मालमत्तांमध्ये न गुंतवल्यास तो एलटीसीजी म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यावर २० टक्के कर लागतो. पण हा नफा अन्य मालमत्ता खरेदीसाठी खर्च केल्यास करातून सवलत मिळते.
मुंबईतील रहिवासी असलेले आर. गवाणकर यांनी स्वत: व पत्नीच्या नावे संयुक्त असलेले घर विकले. त्यातून त्यांना नफा झाला. प्राप्तिकर सवलतींतर्गत या नफ्याची रक्कम अन्यत्र गुंतविण्यासाठी गवाणकर यांनी पत्नी व प्रौढ मुलीच्या नावे फ्लॅट खरेदी केला. पण प्राप्तिकर विभागाने त्यांना २० टक्के कर भरणाची नोटीस बजावली. गवाणकर यांनी विभागाकडे अपील केल्यानंतर हे प्रकरण लवादात गेले. लवादाने त्यावर महत्त्वपूर्ण निर्णय देत, जुन्या मालमत्ता विक्रीतून नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करायची असल्यास तो फ्लॅट किंवा ती मालमत्ता करदात्याच्या नावेच असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्यावर कर भरावा लागेल, असे स्पष्ट केले आहे.