कुलभूषण जाधवांची प्रकृती आणि ठावठिकाण्याविषयी माहिती नाही - परराष्ट्र मंत्रालय
By admin | Published: April 13, 2017 05:12 PM2017-04-13T17:12:59+5:302017-04-13T17:22:06+5:30
कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि त्यांना कुठे बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे, याबाबतची माहिती सध्या भारताकडे नाही
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि त्यांना कुठे बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे, याबाबतची माहिती सध्या भारताकडे नाही. पाकिस्तानकडूनही अशाप्रकारची माहिती देण्यात आलेली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले. तसेच वारंवार विनंती करूनही कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगीसुद्धा पाकिस्तानने दिली नसल्याची माहितीही परराष्ट्र खात्याने दिली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती देताना म्हणाले, "जाधव यांना सध्या कुठे ठेवण्यात आले आहे, त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नाही. त्यांच्याविषयी माहितीचा कोणताही दुवा आमच्याकडे नाही. त्यांच्याविषयी उपलब्ध असणारे परिस्थितीजन्य पुरावे त्यांचे कुठल्यातरी ठिकाणाहून अपहरण झाले असावे याकडे इशारा करत आहेत."
कुलभूषण जाधव इराणमध्ये छोटासा व्यवसाय करत होते. त्याबाबत इराण सरकारलाही कळवण्यात आले होते. पण त्यांच्याकडे याबाबत काही माही माहिती नव्हती. पाकिस्तान गुप्तहेर असल्याचा दावा करत असलेले जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेले नौसैनिक असून, ते सर्वसामान्य भारतीय असल्याची माहिती पाकिस्तानला देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलभूषण जाधव यांची भेट झाल्याशिवाय त्यांच्या अटकेविषयीची सत्यपरिस्थिती कळणार नाही असेही ते म्हणाले, "कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तावडीक कसे काय सापडले याची माहिती घ्यावा लागणार आहे. त्यांच्या पाकिस्तानमधील उपस्थितीबाबत आमच्याकडे माहिती नाही त्यासाठी जाधव यांची भेट होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आम्ही त्यांना भेटू शकतो," असेही बागवे यांनी पुढे सांगितले.