देशभक्तीचे पुरावे देण्याची गरज नाही

By admin | Published: December 2, 2015 04:27 AM2015-12-02T04:27:37+5:302015-12-02T04:27:37+5:30

भारताच्या १२५ कोटी जनतेच्या देशभक्तीबद्दल कोणालाही संशय नाही. त्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आणि कोणी देशभक्तीचे पुरावे देण्याचीही गरज नाही

There is no need to provide patriot evidence | देशभक्तीचे पुरावे देण्याची गरज नाही

देशभक्तीचे पुरावे देण्याची गरज नाही

Next

नवी दिल्ली : भारताच्या १२५ कोटी जनतेच्या देशभक्तीबद्दल कोणालाही संशय नाही. त्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आणि कोणी देशभक्तीचे पुरावे देण्याचीही गरज नाही, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत केले.
राज्यसभेत दोन दिवस झालेल्या संविधान प्रतिबद्धता चर्चेस मोदींनी पॅरिसहून परत येताच उत्तर दिले. पंतप्रधान म्हणाले की, बिखरने के लिए बहाने तो बहुत मिल जायेंगे... जोडने के अवसर खोजना हमारा दायित्व है। तू तू.. मै मै.. करून देशाचे राजकारण चालत नाही. अत्याचार, अनाचार हा देशावर लागलेला कलंक आहे. समाजातले सौहार्द आणि सामंजस्य टिकवण्यासाठी समतेबरोबर ममतेचीही आवश्यकता आहे. त्यासाठी समभावाबरोबर आपण ममभावाचाही पुरस्कार केला पाहिजे.
मोदी म्हणाले की, आपली राज्यघटना केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून सामाजिक प्रेरणेचाही दस्तऐवज आहे. पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचे महत्त्व वाटावे, यासाठीच संविधानाचा उत्सव आपण संसदेत साजरा केला. संविधान सभेला राज्यघटनेची निर्मिती करताना बऱ्याच दबावाचा सामना करावा लागला असेल. अनेक प्रकारचे विचार व्यक्त झाले असतील. तरीही सर्वांचा साकल्याने विचार करून एक सर्वश्रेष्ठ राज्यघटना घटनेच्या शिल्पकारांनी आम्हाला प्रदान केली. याची जाणीव करून देत पंतप्रधान म्हणाले, घटनेचा मसुदा तयार करण्याच्या समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, त्यांचे १२५वे जयंती वर्ष आपण साजरे करीत आहोत. तथापि संविधान सभेत काँग्रेसचे अनेक महान नेतेही होते. आम्हाला त्यांचाही अभिमान वाटतो. आमच्यात ही हिंमत आहे की सकारात्मक नजरेने आम्ही त्यांच्या योगदानाकडे पाहतो. त्या सर्वांना नमन करण्यासाठीच संसदेत संविधान दिन आपण साजरा केला.
या वेळी विशेष जोर देत पंतप्रधान म्हणाले, संसदेत पक्ष आणि विपक्ष अशा भूमिका वठवताना आपल्या सर्वांकडून कधीतरी निष्पक्ष वागण्याचीही अपेक्षा आहे. श्रेष्ठ लोक जे काम करतात, लोक त्यांचे अनुकरण करतात. नियतीने आपल्यावरही काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. संसदेची दोन्ही सभागृहे नवा आदर्श तेव्हाच निर्माण करू शकतील, जेव्हा परस्पर सहकार्याने या सभागृहांचे कामकाज चालेल.
औद्योगिकीकरणाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतन उद््धृत करताना पंतप्रधान म्हणाले, पददलित व वंचित समाजाकडे जमीन नव्हती. सन्मानाने त्यांची उपजीविका कशी चालेल, याचा विचार करताना बाबासाहेब म्हणाले होते की, भारताचे व्यापक औद्योगिकीकरण हाच
कृषी समस्येचा उपाय आहे, कारण गरिबांना रोजगार मिळवून देण्याची मोठी क्षमता त्यात आहे. त्यांचे तेच विचार आजही महत्त्वाचे आहेत. संधीहिनाला संधी मिळवून देणे आपले कर्तव्यच आहे. मॅक्स मुल्लरने भारताविषयी व्यक्त केलेले विचार उद्धृत करीत, भाषणाच्या अखेरीला पंतप्रधान म्हणाले, जगाच्या पाठीवर एकच स्वर्ग आहे, तो म्हणजे भारत! देशासमोर जी आव्हाने आहेत, त्यांचा मुकाबला सर्वांना बरोबर घेऊनच आपल्याला करावा लागणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: There is no need to provide patriot evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.