नम्रता डामोर प्रकरणाची नव्याने चौकशी नाहीच
By admin | Published: July 9, 2015 12:03 AM2015-07-09T00:03:34+5:302015-07-09T00:03:34+5:30
मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्यातील कथित लाभार्थी नम्रता डामोर हिच्या मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यावरून मध्यप्रदेश पोलीस बुधवारी काही
उज्जैन (मप्र.) : मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्यातील कथित लाभार्थी नम्रता डामोर हिच्या मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यावरून मध्यप्रदेश पोलीस बुधवारी काही तासांतच घूमजाव करताना दिसले. नम्रता प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सकाळी सांगितले. मात्र यानंतर काही तासांतच असे कुठलेही आदेश नसल्याचे सांगत सपशेल घूमजाव केले.
उज्जैनचे पोलीस अधीक्षक मनोहर सिंह वर्मा यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना नम्रता डामोर मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. तरानाचे एसडीओपी आर.के. शर्मा या प्रकरणाची नव्याने चौकशी करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र संध्याकाळ होत नाही तोच, उज्जैन रेंजचे पोलीस महानिरीक्षक व्ही. मधुकुमार यांनी असे कुठलेही आदेश नसल्याचे स्पष्ट केले. नम्रता डामोर मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण झाला आहे. याचा अहवालही सादर करण्यात आला आहे. तेव्हा नव्याने चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालय वा अन्य सक्षम संस्थेने आदेश दिले तरच एखाद्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली जाऊ शकते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली
जानेवारी २०१२ रोजी उज्जैन जिल्ह्णातील रेल्वे रुळांनजीक नम्रताचा मृतदेह आढळून आला होता. नम्रताच्या मृत्यूप्रकरणी आधी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र नंतर तिचा मृत्यू केवळ ‘अपघात’ असल्याचे सांगून या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली होती. व्यापमं घोटाळ्यातील कथित लाभार्थी असलेल्या नम्रताच्या मृत्यूचे प्रकरण त्यामुळेच विस्मृतीत गेले होते. मात्र गत शनिवारी व्यापमं घोटाळ्याचा तपास करणारे वृत्तवाहिनी पत्रकार अक्षय कुमार सिंग हे नम्रताच्या माता-पित्याची मुलाखत घ्यायला पोहोचले होते आणि या मुलाखतीनंतर लगेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अक्षयकुमार यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर नम्रताचे मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते.
व्यापमंचे धागेदोरे उत्तर प्रदेशापर्यंत
लखनौ : मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्याचे तार उत्तर प्रदेशाशी जुळलेले असल्याचे तपासाअंती समोर आले आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील पाच वैद्यकीय महाविद्यालयांतील ३६ विद्यार्थ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, चार अन्य अद्यापही फरार आहेत.
वकील अचानक अस्वस्थ
जबलपूर : मध्यप्रदेश उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ आदर्शमुनी त्रिवेदी बुधवारी रहस्यमय स्थितीत आजारी पडल्याने व्यापमं प्रकरणाशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीस हजर राहू शकले नाहीत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बेकायदेशीर प्रवेश प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी जनयाचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर त्रिवेदी युक्तिवाद करणार होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्रिवेदींवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
त्रिवेदी मंगळवारी पहाटे कार्यालयात बसले. यावेळी त्यांच्यापुढे ‘मंगोडे’ (मसूद आणि चण्यापासून बनवलेला एक खाद्यपदार्थ) ठेवलेले होते. दररोजप्रमाणे ते घरून आले असावे वा एखाद्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तीने आणले असावे असे समजून त्रिवेदींनी ते खाल्ले आणि त्यानंतर लगेच त्यांची प्रकृती बिघडली.
(वृत्तसंस्था)
या घटनेनंतर त्रिवेदींचा मुलगा आशीष त्रिवेदी याने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. माझ्या वडिलांना नुकसान पोहोचविण्याच्या इराद्याने जाणीवपूर्वक त्यांना कुणीतरी ‘मंगोडे’खायला दिले गेल्याचा संशय असल्याचे त्याने सांगितले.