नोटा छापण्याशिवाय अन्य पर्याय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:31 AM2020-08-22T06:31:00+5:302020-08-22T06:31:29+5:30

पण सर्व काही बंद राहिले तर कोरोनापेक्षा अधिक लोक उपाशीपोटी राहिल्याने मृत्युमुखी पडतील.

There is no other option but to print the note | नोटा छापण्याशिवाय अन्य पर्याय नाही

नोटा छापण्याशिवाय अन्य पर्याय नाही

Next

- जयेंद्र भाई शाह
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट आणि गुंतवणूक विशेषज्ञ जयेंद्र भाई शाह यांचे मत अतिशय स्पष्ट आहे की, सरकारने नोटा तर छापाव्यातच; पण हेही निश्चित करावे की, सामान्य माणसापासून ते उद्योजकांपर्यंत हा पैसा पोहोचावा. ते म्हणतात की, लॉकडाऊन पूर्णपणे हटवायला हवे. निश्चितच कोरोनाचे रुग्ण वाढतील; पण सर्व काही बंद राहिले तर कोरोनापेक्षा अधिक लोक उपाशीपोटी राहिल्याने मृत्युमुखी पडतील.
विकास मिश्र / नागपूर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रश्न : व्यापार-व्यवसायाचे भविष्य कसे दिसते? बाजारपेठेला आधीसारखी चमक येईल?
शाह : भारतात किरकोळ व्यापाराचे फार महत्त्व आहे. किरकोळ व्यापारात फार लोक गुंतलेले आहेत. त्यातून अनेकांना तो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देतो. गेल्या पाच महिन्यांत काय झाले हे बघा. बाजार बंद असल्यामुळे लोक दुकानांवर जाऊ शकले नाहीत. बऱ्याच लोकांनी आॅनलाईन व्यवहाराचा मार्ग निवडला. लोकसंख्येचा विचार करता तो कमी असू शकेल; परंतु हा बदल महत्त्वाचा आहे. बºयाच लोकांनी वर्क फ्रॉम होम कल्चर आत्मसात केली आहे. याकडे तुम्ही लक्ष द्या. ही कल्चर जशी वाढेल तसे लोक बाजारात कमीच जाऊ शकतील व त्यामुळे आॅनलाईनला जास्त लोक पसंती देत आहेत. मला वाटते की, आॅनलाईनमध्ये वाढ होईल आणि लॉजिस्टिक, गोदामे, डिलिव्हरी क्षेत्रात रोजगारनिर्मिती तर होईल; परंतु जे लोक फिजिकल रिटेलमध्ये काम करीत आहेत त्यातील बरेचसे लोक रोजगार गमावतील किंवा त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल.
प्रश्न : या परिस्थितीत आम्ही स्थायीरीत्या वर्क फ्रॉम होमकडे जात आहोत का?
शाह : कोरोना महामारीच्या आधी बहुतकरून क्षेत्रांत काम करणाºयाची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असायची; परंतु महामारीने आपल्याला हे शिकवले की, अशी अनेक कामे आहेत की, त्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थितीची गरज नाही. जे लोक या प्रकारे काम करीत आहेत त्यांच्यासाठी निश्चितच वर्क फ्रॉम होम कल्चर वाढेल व त्यामुळे सगळ्यांची सोयही होईल.
प्रश्न : मग काय करता येईल?
शाह : सध्या आपण काही करू शकत नाही. ही वेळ निघून जाऊ द्या. कारखान्यांत गेल्या मार्चमध्ये जेवढे मजूर होते तेवढे ते आता त्यांना मिळत नाहीत. नोकºया आहेत; परंतु त्या जागा भरल्या जात नाहीत. कारण मजूर घरी गेले आहेत. आज ते परतत नाहीत. कारण त्यांना सरकारी साह्य मिळत आहे. जेव्हा हे साह्य संपून जाईल तेव्हा ते परत येतील. तेव्हा त्यांना नोकरी मिळेल? मला अशा कंपन्या माहीत आहेत की, ज्यांना लोक मिळत नाहीत; परंतु कमी मजुरांतही ते उत्पादन वाढवण्यात व्यस्त आहेत. जर कमी मजुरांना कामाची कला अवगत झाली तर स्थायी रोजगारांचे नुकसान होईल. जेव्हा मजूर परततील तर कदाचित त्या सगळ्यांना रोजगार मिळणारही नाही.
प्रश्न : जर सरकारने आणखी चलनी नोटा छापून त्या बाजारात आणल्या, तर चलनवाढ होईल. फायदा काय होणार?
शाह : चलनात नव्याने नोटा आल्या, तर चलनवाढ होणारच; परंतु सरकारने नोटा नाही छापल्या तर प्रदीर्घ काळाची मंदी येऊ शकते. वेळच अशी आहे की, सरकारने नोटा छापाव्यात आणि हे सुनिश्चित करावे की, सामान्य माणसापासून ते उद्योगपतींपर्यंत तो पैसा पोहोचावा. हे तर स्पष्ट आहे की, तुम्ही चलनात पैसा टाकणार, तर चलनवाढ वाढेल; पण हा असा प्रश्न आहे, तो नंतरही सोडवला जाऊ शकतो. उदा.- जर तुम्ही चार दिवस जेवण केले नाही व दहा दिवसांनंतर पौष्टिक अन्न खाल्ले, तर त्याचा उपयोग काय? तुम्हाला आज जेवण पाहिजे. मग ते जंक फूडदेखील चालेल. जर तुम्हाला जिवंत राहायचे असेल, तर आज मिळणारे जंक फूडही खावे लागेल. जेव्हा तुमच्या हातात पर्याय असेल तेव्हा आरोग्यदायी अन्नाला प्राधान्य द्यावे. यावर्षी कर संकलन आणि ग्राहक वस्तूंची मागणी कमी असेल. या स्थितीत सरकारला नोटा छापणे आणि खर्च करण्यावर लक्ष द्यावे लागेल. जेव्हा अर्थव्यवस्था सुरळीत होईल तेव्हा चलनवाढ नियंत्रणात ठेवावी. आज तिच्यावर नियंत्रण ठेवाल, तर मोठ्या संकटात अडकाल.
प्रश्न : असे समजा की, येत्या तीन-चार महिन्यांत कोरोना लस उपलब्ध झाल्यास बाजारावर कोणता परिणाम होईल?
शाह : समजा लस उपलब्ध होऊन वेगाने लसीकरणही सुरू झाले; परंतु प्रश्न असा की, त्यासाठी किती वर्षे लागतील? येथे तर जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा सुरू आहे. आयात-निर्यात अनिवार्य आहे. जर भारतात लसीकरण झाले व जगात नाही झाले किंवा जगात झाले; पण भारतात झाले नाही, तर काय होईल? माझे मत असे की, याचा काही परिणाम होईल; पण पूर्ण नाही.
प्रश्न : बाजार, व्यवसाय, रेल्वे, बसगाड्या सुरू कराव्यात की बंद ठेवाव्यात? तुम्हाला काय वाटते?
शाह : किती दीर्घ काळ तुम्ही या सेवा बंद ठेवाल? त्या सुरू केल्या नाहीत, तर व्यवसाय कसा होईल? मध्यमवर्ग किती दिवस घरी बसून खाणार? सरकार किती दिवस अनुदान देणार? जेव्हा उपासमार होते, तेव्हा कोणताही विचार नसतो. आता सरकारने सगळे काही खुले केले पाहिजे. कोविडचे रुग्ण निश्चितच वाढतील. मला तर असे वाटते की, जर कोविडने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ती दु:खद बाब; पण जेव्हा सगळे काही बंद असेल तेव्हा १० लोक उपासमारीने मरतील, तेव्हा सरकार काय करील? सामान्य माणसाचे हित यातच आहे की, बाजारपेठ पूर्णपणे सुरू केली पाहिजे.
मुलाखतीचा दुसरा भाग उद्याच्या अंकात

Web Title: There is no other option but to print the note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.