देशात असहिष्णुता आणि भेदभावाला थारा नाही - सोनिया गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 06:00 AM2019-08-16T06:00:17+5:302019-08-16T06:01:01+5:30
देशात असहिष्णुता आणि भेदभावाला कोणताही वाव नाही. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला बळकटी द्यावी
नवी दिल्ली : देशात असहिष्णुता आणि भेदभावाला कोणताही वाव नाही. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला बळकटी द्यावी,असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त संदेशात नमूद केले आहे.
काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाने अनेक क्षेत्रात आघाडी घेतली असली तरी सत्य, अहिंसा, दयाभाव आणि देशभक्ती या मूलतत्त्वांचे पालन व्हायला हवे. दयाभाव, सहजीवन आणि सर्वसमावेशक विकासाच्या तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. लोकशाहीवादी आणि लवचिक असलेला आपला देश ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे. येथे असहिष्णुता, अंधश्रद्धा, वंशवाद, धर्मवाद, अन्यायाला कोणताही वाव नाही, तथापि असंख्य लोकांना दररोज भेदभावाचा मुकाबला करावा लागत आहे. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खºया अर्थाने स्वातंत्र्य बळकट करायला हवे, असेही त्या म्हणाल्या. ध्वजारोहणाच्या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, अहमद पटेल, भूपिंदरसिंग हुडा, कपिल सिब्बल, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी देशवासीयांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छाही दिल्या.