गुजरातेत भाजपाला निर्णायक बहुमत मिळण्याची शक्यता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:28 AM2017-12-05T04:28:05+5:302017-12-05T04:28:32+5:30
विधानसभा निवडणुकीत निर्णायक बहुमत ना भाजपाला मिळेल ना काँग्रेसला. अपक्ष, छोटे पक्ष यांच्या मदतीने भाजपा सरकार बनवेल, असे भाकीत सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेशदेवी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
संदीप प्रधान
बडोदा : विधानसभा निवडणुकीत निर्णायक बहुमत ना भाजपाला मिळेल ना काँग्रेसला. अपक्ष, छोटे पक्ष यांच्या मदतीने भाजपा सरकार बनवेल, असे भाकीत सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेशदेवी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा पराभवाची धूळ चाखत नाहीत या मिथकाचा शेवट ही निवडणूक करेल, असा दावाही त्यांनी केला.
गुजरातमधील आदिवासी व दुर्गम भागातील नष्ट होणाºया भाषांचा अभ्यास करण्यासाठी गणेशदेवींचा बडोद्यात मुक्काम असतो. निवडणुकीबाबत त्यांनी आपली रोखठोक मते व्यक्त केली. गणेशदेवी म्हणाले की, २००२नंतरच्या १५ वर्षांत गुजरातमध्ये काँग्रेसची ताकद हळूहळू वाढत आहे. महापालिका व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही काँग्रेसला यश मिळाले. नरेंद्र मोदी यांच्या भरभराटीच्या काळात गुजरातमध्ये काँग्रेस वाढणे, हे वैशिष्ट्य आहे. मोदी पंतप्रधान झाले आणि अमित शहा यांच्याशी पटत नसल्याने आनंदीबेनना जावे लागले.
गुजरातमध्ये अमित शहा व आनंदीबेन पटेल यांच्या वादातून हार्दिक पटेल या पाटीदार समाजाच्या नेत्याचा उदय झाला आहे, असा दावा गणेशदेवी यांनी केला. हार्दिकच्या मदतीखेरीज गुजरातमध्ये काँग्रेसची ताकद वाढत आहे. केंद्रात सत्तेत असल्याने दबावतंत्राचा वापर करून अपक्ष, छोटे पक्ष यांच्या मदतीने भाजपा सत्ता स्थापन करेल. मात्र अमित शहा पराभवाची धूळ चाखत नाहीत या मिथकाचा ही निवडणूक शेवट करेल. देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणारी ही निवडणूक ठरेल, असे गणेशदेवी म्हणाले.
राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे संकेत
भावी राजकारणाचे संकेत सट्टेबाजार देत असतो. गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी फटकून वागत आहे. सट्टाबाजार जेवढे स्पष्ट संकेत देतो तेवढेच स्पष्ट संकेत रा. स्व. संघ देतो हे विसरून चालणार नाही, अशी खोचक टिप्पणीही गणेशदेवी यांनी केली.