मोदी सरकारवर संघाचा दबाव नाही -गडकरी
By admin | Published: May 21, 2015 12:39 AM2015-05-21T00:39:50+5:302015-05-21T08:33:34+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोदी सरकारवर कुठलाही दबाव टाकण्यात येत नाही अथवा निर्देश दिले जात नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोदी सरकारवर कुठलाही दबाव टाकण्यात येत नाही अथवा निर्देश दिले जात नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. मंत्रिमंडळात मंत्र्यांना आपले विचार मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच काही वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटींना फारसे महत्त्व न देता सरसंघचालक राष्ट्रीय सुरक्षा व शिक्षणासारख्या मुद्यांमध्ये रुची घेत असतात, असे गडकरी यांनी बुधवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीबाबत भाजपच्या काही नेत्यांनी रा.स्व. संघाकडे तक्रार केल्याचे सांगितले जाते; परंतु गडकरींनी या सर्व चर्चा निरर्थक असल्याचे सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिवंतपणा असतो. एखाद्या विषयावरील चर्चेत कुठल्या मंत्र्याला मुद्दा पटला नसेल तर मोकळेपणाने ते आपला विरोध नोंदवितात, असा दावा गडकरी यांनी केला. मोदींनी सर्व अधिकार स्वत:जवळ ठेवले असल्याचा आरोप फेटाळताना पंतप्रधान इतरांचेही अनेक विचार स्वीकारतात. भारतीय जनता पार्टी हा एक लोकशाही असलेला पक्ष आहे. मीसुद्धा या पक्षाचा अध्यक्ष होतो आणि मला त्याचा चांगला अनुभव आहे. कुठलीही एक व्यक्ती हा डोलारा सांभाळू शकत नाही आणि एकट्याने पक्षावर शासन करू शकत नाही, असे गडकरी यांनी सांगितले.
या बैठकांबद्दल माध्यमांनी दिलेल्या वृत्तात काहीही तथ्य नाही. मी स्वयंसेवक आहे आणि संघावर माझी आस्था आहे हे सांगताना मला कुठलेही भय वाटत नाही. पर्रीकर आणि राजनाथसिंग यांचेही असेच आहे. संघ आमच्यावर कुठलाही दबाव आणत नाही.
-नितीन गडकरी,
केंद्रीय मंत्री