दिल्लीतही दूधकोंडीवर तोडगा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 05:48 AM2018-07-18T05:48:56+5:302018-07-18T05:49:00+5:30
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले दूध आंदोलन आपल्यासाठी राजकीय संकट ठरत असल्याचे पाहून केंद्रातील भाजपा सरकारने आपल्या पातळीवर तीन केंद्रीय मंत्र्यांना मंगळवारी या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यूहरचनेची जबाबदारी दिली होती.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले दूध आंदोलन आपल्यासाठी राजकीय संकट ठरत असल्याचे पाहून केंद्रातील भाजपा सरकारने आपल्या पातळीवर तीन केंद्रीय मंत्र्यांना मंगळवारी या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यूहरचनेची जबाबदारी दिली होती. परंतु ते तोडगा काढू शकले नाहीत.
या मंत्र्यांमध्ये सरकारसाठी नवे संकटनिवारक म्हणून प्रसिद्ध होत असलेले रेल्वे व कोळसा मंत्री व हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. त्याचवेळी गुवाहाटीत कार्यक्रमाला गेलेले केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्कात आले. परंतु, तिन्ही मंत्री महाराष्ट्रातील या राजकीय संकटाचे मूळ कारण दुधाचे भाव वाढवून देण्याच्या मागणीवर कोणताही उपाय शोधू शकले नाहीत.
या प्रश्नावर बुधवारी पुन्हा दिल्लीत बैठक होईल व तीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सहभागी होतील. जागतिक पातळीवर दुधाचे भाव स्थिर असल्यामुळे बुधवारच्या बैठकीत कदाचित या प्रश्नावर कोणताही उपाय हाती लागणार नाही. म्हणून सरकार हा प्रश्न कसा सोडवेल, याचे अंदाज व्यक्त होत आहेत.