मतदान यंत्रांमध्ये बिघाड झालाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:10 AM2018-05-30T05:10:10+5:302018-05-30T05:10:10+5:30
देशाच्या ४ लोकसभा व १0 विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानात ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी आल्या असल्या तरी मतदान यंत्रांमध्ये बिघाड
नवी दिल्ली : देशाच्या ४ लोकसभा व १0 विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या मतदानात ईव्हीएमविषयी असंख्य तक्रारी आल्या असल्या तरी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारीच मुख्य निवडणूक आयु्क्तांनी फेटाळून लावल्या आहेत.
मतदानावेळी अनेक मतदान यंत्रे सुरू नव्हती, काही ठिकाणी ती बिघडली, काही ठिकाणी ज्याला मत द्यायचे ते बटनच दाबले जात नव्हते, अशा असंख्य तक्रारी पालघर, गोंदिया-भंडारा तसेच उत्तर प्रदेशातील कैराना येथून आल्या. या तिन्ही ठिकाणी त्यामुळे काही मतदारांना घरी परतावे लागले, ते यंत्र सुरू झाल्यानंतर पुन्हा मतदानासाठी परतले नाहीत. परिणामी तिथे मतदान कमी झाले.
याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोक दल, बहुजन विकास आघाडी, भारिप-बहुजन महासंघ यांच्या नेत्यांनी लगेचच राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. उन्हामुळे काही यंत्रांत बिघाड झाल्याचे निवडणूक अधिकाºयांनीही मान्य केले होते. पण मतदान यंत्रांमध्ये कुठेही बिघाड नव्हता मात्र पहिल्यांदाचव वापर करण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट (मतदानानंतर मिळणारी चिठ्ठी)विषयी तक्रारी होत्या, असा दावा आयुक्त ओ. पी. रावत यांनी केला. सपाचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, आज उन्हाळ्यामुळे यंत्रांत बिघाड झाला असे अधिकारी सांगतात उद्या पावसामुळे वा थंडीमुळे बिघाड झाला, असेही सांगतील.
पुढील वर्षी लोकसभा निवडणुका ऐन उन्हाळ्यातच होणार आहेत. तेव्हा असे प्रकार घडले, तर साराच गोंधळ होईल. त्यामुळे मतपत्रिकांचाच वापर यापुढील निवडणुकांमध्ये करण्यात यावा. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा, रालोद, राजद अशा सर्वच विरोधी पक्षांनी मतदानासाठी मतदानपत्रिकाच असाव्यात, अशी मागणी केली आहे.