दोन हजारांच्या नोटा रद्द करण्याचा प्रस्ताव नाही
By admin | Published: March 18, 2017 01:31 AM2017-03-18T01:31:38+5:302017-03-18T01:31:38+5:30
नव्या दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिले.
नवी दिल्ली : नव्या दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी लागू करण्यात आल्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या.
दोन हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असे सांगून अरुण जेटली म्हणाले की, १0 डिसेंबर २0१६ रोजीच्या आकडेवारीनुसार १२.४४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बँकांत जमा झाल्या आहेत. हा आकडा प्रत्यक्ष नोटांशी पडताळून पाहण्यात येईल. त्यानंतरच चलनात किती बनावट नोटा होत्या हे कळू शकेल.
याशिवाय मोजण्यातील चुका आणि नोटा दोन वेळा मोजल्या जाण्याची शक्यताही आहे. अंतिम आकडा काढण्यापूर्वी या सर्व बाबी तपासल्या जातील.
जेटली यांनी सांगितले की, ३ मार्च २0१७ रोजी चलनात असलेल्या सर्व नोटांचे एकूण मूल्य १२ लाख कोटी रुपये होते. हा आकडा २७ जानेवारी रोजी ९.९२१ लाख कोटी रुपये इतका होता.