अर्बन बँकांच्या नावातून ‘बँक’ हा शब्द वगळण्याचा प्रस्ताव नाही; कृषि सचिवांनी केला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 04:35 AM2019-12-13T04:35:05+5:302019-12-13T04:35:33+5:30
गैरसमज पसरवणाऱ्या बातम्यांमुळे प्रवर्तकांमध्ये घबराट
नवी दिल्ली : देशातील अर्बन बँकांच्या नावातून बँक शब्द वगळण्याचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नाही. त्यामुळे अर्बन बँकांच्या प्रवर्तकांनी घाबरून जाऊ नये असा खुलासा कृषी उपसचिव विवेक अग्रवाल यांनी केला आहे.
अर्बन बँकांमध्ये आर्थिक घोटाळे वाढत आहेत त्यामुळे अर्बन बँकांच्या नावामधून बँक शब्द वगळावा अशी सूचना करणारे पत्र मुंबईतील स्टेट बँकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाºयाने ऑक्टोबर महिन्यात रिझर्व्ह बँकेला पाठवले होते. ही बाब कर्णोपकर्णी पसरुन प्रसार माध्यमांमधून बातम्याही आल्या होत्या, त्यामुळे अर्बन बँकांच्या प्रवर्तकांमध्ये घबराट पसरली होती.
नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी परवाक विदर्भ अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स असोशिएशनचे एक शिष्टमंडळ दिल्लीत काल केंद्रीय निबंधकांनी भेटले तेव्हा अग्रवाल यांनी हा खुलासा केला. शिष्टमंडळात विदर्भ अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स असोशिएशनचे अध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष व विधान परिषद सदस्य प्रा. अनिल सोले व गांधीबाग सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र दुरुगकर सहभागी होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही बैठकीत उपस्थित होते, अशी माहिती कैलासचंद्र अग्रवाल यांनी दिल्ली.