तेजस्वींच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही - लालूप्रसाद यादव
By Admin | Published: July 14, 2017 11:50 PM2017-07-14T23:50:49+5:302017-07-14T23:50:49+5:30
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट शब्दात धुडकावून लावली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - भ्रष्टाचाराचे आरोप झालेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट शब्दात धुडकावून लावली आहे. केवळ गुन्हा दाखल होणे हे राजीनाम्या साठी पुरेसे कारण ठरू शकत नाही, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. लालू यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्यातील मदभेद अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.
लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यापासून जेडीयूकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आपला पक्ष भ्रष्टाचाराप्रकरणी कोणतीही त़डजोड करणार नसल्याचे जेडीयूकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र जेडीयूकडून येत असलेल्या दबावाचा लालूप्रसाद यादवांवर कोणताही परिणाम झालेला नाही. लालू म्हणाले, "विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत तेजस्वी यादव यांनी राजीनामा देऊ नये असा निर्णय झाला होता. कुणाविरोधात गुन्हा दाखल होणे हे राजीनाम्याचे कारण होऊ शकत नाही. पण आम्ही या प्रकरणाचा बिहारमधील महाआघाडीवर परिणाम होऊ देणार नाही."
बिहारमधील महाआघाडीमधील मतभेद दूर करण्यासाठी सोनिया गांधी यांनी आपल्याशी आणि नितीश कुमार यादवांशी संपर्क साधल्याच्या वृत्ताचेही त्यांनी खंडण केले. दरम्यान, आरजेडीने आपल्या ८० आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला होता. राष्ट्रीय जनता दलाचे बिहार अध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी आपल्या पक्षाकडे ८० आमदारांचे बळ असल्याचे वक्तव्य केले होते.
FIR is not sufficient reason for the resignation: Lalu Prasad Yadav on Tejashwi Yadav pic.twitter.com/oAJ0mlq4Jj
— ANI (@ANI_news) July 14, 2017