भारत-पाकिस्तान मालिकेचा प्रश्नच येत नाही - अनुराग ठाकूर
By Admin | Published: October 4, 2016 04:37 PM2016-10-04T16:37:45+5:302016-10-04T16:42:29+5:30
भारत पाकिस्तानमध्ये ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभुमीवर भारत-पाक क्रिकेट मालिकेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी अत्यंत महत्वाचं विधान
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - भारत पाकिस्तानमध्ये ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभुमीवर भारत-पाक क्रिकेट मालिकेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे. याक्षणी तरी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका होण्याचा प्रश्नच येत नाही असं ठाकूर म्हणाले आहेत.
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, 'यावर्षी तरी भारत- पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रश्नच येत नाही. सर्वात आधी मी एक भारतीय आहे, माझ्यासाठी पहिले माझा देश येतो, देशापेक्षा महत्वाचं काहीच नाही. भारत - पाकिस्तानदरम्यान क्रिकेट सामने होण्यासाठी दोन्ही देशांमध्ये योग्य वातावरण असणं गरजेचं आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत तर हा प्रश्नच उद्भवत नाही' असं ठाकूर म्हणाले.
यावेळी, बोलताना ठाकुर यांनी पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांच्यावरही निशाणा साधला . भारताला ऑल आउट करा असं चिथावणीखोर विधान मियांदाद यांनी केलं होतं. त्यावर ज्यांचे कुख्यात दाऊद इब्राहीमसोबत संबंध आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते आपल्यासोबत कधी वर्ल्ड कपमध्येही जिंकू शकले नाहीत आणि झालेल्या प्रत्येक युद्धातही त्यांचा पराभव झाला असं म्हणत ठाकूर यांनी मियांदादला प्रत्युत्तर दिले.