आगामी दहा दिवस राज्यात पाऊस नाही
By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:12+5:302015-08-18T21:37:12+5:30
Next
> सप्टेंबरमध्ये चांगल्या प्रमाणात पुणे : मॉन्सूनचा पाऊस आगामी दहा दिवस राज्यात होणार नाही. त्यामुळे सर्व पिकांना ताण सहन करावा लागेल, जनावरांच्या चा-याची समस्या निर्माण होऊ शकेल, मात्र सप्टेंबरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानाशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी आज येथे सांगितली. ते म्हणाले जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात खंड पडेल, असे भाकित मी वर्तविले होते, ते प्रत्यक्षात आले आहे.आगामी दहा दिवस पावसात खंड पडणार आहे. त्यामुळे खरिपाच्या सर्व पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागेल. जिरायती भागात जेथे उशीरा उगवण झाली आहे, त्या पिकांना धोका उदभवेल. सध्याचा चारा पुढच्या दहा दिवसांत संपून नव्या चा-याची उगवण होईपर्यंत जनावरांच्या चा-याचा तुटवडा होऊ शकेल. पिण्याच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन काही ठिकाणी समस्या उदभवू शकेल. डॉ. साबळे म्हणाले २७ किंवा २८ जूनपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल. १५ ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस होईल. त्याचा फायदा रब्बीच्या पेरण्यांना होईल. हवामान शास्त्र विभागाने पावसात दहा टक्के घट होईल, असे म्हटले आहे. मात्र तो जून ते ऑगस्ट दरम्यानचा अंदाज आहे. अल निनोचा परिणाम पुढच्या पावसावर दिसेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे, मात्र मला माझ्या अभ्यासानुसार अल निनोचा परिणाम जाणवणार नाही असे वाटते, असेही त्यांनी नमूद केले.