सीएए, कलम ३७० वर पुनर्विचार नाही, मोदींचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 06:29 AM2020-02-17T06:29:47+5:302020-02-17T06:30:18+5:30

पंतप्रधान मोदी यांचे स्पष्टीकरण : १,२५० कोटींच्या विकासकामांचे वाराणसीत लोकार्पण

There is no reconsideration of the CAA, Section 4, modi says | सीएए, कलम ३७० वर पुनर्विचार नाही, मोदींचं स्पष्टीकरण

सीएए, कलम ३७० वर पुनर्विचार नाही, मोदींचं स्पष्टीकरण

Next

वाराणसी : जगभरातील दबावानंतरही आमचे सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आणि जम्मू- काश्मिरातील कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाबाबत ठाम आहे, असे स्पष्ट करीत याबाबत पुनर्विचाराची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे फेटाळून लावली.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मतदारसंघात वाराणसीत पंडित दीनदयाल उपाध्याय मेमोरिअल सेंटर राष्ट्राला समर्पित केले. याशिवाय विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. त्यानंतर बोलताना मोदी म्हणाले की, काश्मिरातील कलम ३७० हटविण्याच्या आणि सीएएच्या निर्णयाची देशाला प्रतीक्षा होती. देशात विविध भागांत सीएएविरोधात आंदोलन होत असताना पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.
मोदी म्हणाले की, पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात येणार आहे. यातील मोठा हिस्सा छोट्या शहरांत जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी जवळपास १,२५० कोटी रुपये खर्चाच्या ५० विविध योजनांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले.
यात काशी हिंदू विद्यापीठातील ४३० खाटांच्या सुपर स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटलचा समावेश आहे. मोदी यांनी एका व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून आयआरसीटीसीच्या ‘महाकाल एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखविला. देशातील पहिली ओव्हरनाईट खासगी रेल्वे तीन ज्योतिर्लिंग तीर्थस्थळे वाराणसी, उज्जैन आणि ओंकारेश्वरला जोडेल. तत्पूर्वी, मोदी यांनी वीरशैव समुदायाच्या जंगमबाडी मठात आयोजित श्री जगद्गुरू विश्वराध्य गुरुकुलच्या शताब्दी समारंभाच्या समारोपाला हजेरी लावली. मोदी यांनी स्वदेशी वापरण्यावर भर देण्याचे आवाहनही केले.

अयोध्येतील ट्रस्ट वेगाने काम करील : मोदी
च्अयोध्येतील राममंदिर उभारणीबाबत मोदी म्हणाले की, मंदिर उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेले ट्रस्ट वेगाने काम करील. जुन्या समस्यांवर तोडगा काढला जात आहे. अयोध्येतील सरकारकडून अधिग्रहित ६७ एकर जमीन नव्या ट्रस्टला सोपविण्यात येईल. या कार्यक्रमास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती होती.

Web Title: There is no reconsideration of the CAA, Section 4, modi says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.