बीएचयूमधील मुलींवर निर्बंध नाही; कपडे, मांसाहार हा त्यांचा निर्णय - प्रॉक्टरचा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 02:28 AM2017-09-30T02:28:54+5:302017-09-30T02:29:35+5:30
बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) पहिल्या नवनियुक्त प्रॉक्टर रोयोना सिंग यांनी विद्यार्थिनींना अमूक एका कपड्यांचे व मद्यपानाबद्दल बंधन नसेल; तसेच विद्यापीठाच्या खाणावळीत मांसाहारी भोजनालाही बंदी घातली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) पहिल्या नवनियुक्त प्रॉक्टर रोयोना सिंग यांनी विद्यार्थिनींना अमूक एका कपड्यांचे व मद्यपानाबद्दल बंधन नसेल; तसेच विद्यापीठाच्या खाणावळीत मांसाहारी भोजनालाही बंदी घातली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
विद्यापीठाच्या १०१ वर्षांच्या इतिहासात हे पद प्रथमच महिलेला दिले गेले आहे. रोयोना यांचे नाव हे फ्रान्समधील एका गावावरून ठेवलेले आहे. त्या म्हणाल्या की, माझा जन्म युरोपमधील. मी नेहमी युरोप आणि कॅनडामध्ये प्रवास करते. मुलींवर कपड्यांचे बंधन घालणे म्हणजे मला स्वत:वर निर्बंध घातल्यासारखे वाटते.
त्या म्हणाल्या की, अनेकदा तुमचा दिवस सकाळी ६ वाजता सुरू होऊन रात्री साडेदहाला संपतो. अशा परिस्थितीत तुम्हाला सोयीचे होतील, ते कपडे तुम्ही घालू शकत नसाल तर या युगात ते लाजिरवाणे आहे. मुलींना सोयीचे वाटत असलेले कपडे त्यांनी घातल्यावर मुलांनी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.
‘तंग कपडे’ असे मुले म्हणतात त्या वेळी मला विचित्र वाटते, असे त्या म्हणाल्या. रोयोना सिंग या विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये अॅनॉटॉमीच्या प्राध्यापक आहेत. भूतकाळात या विद्यापीठाने महिलांवर कोणतेही निर्बंध लादलेले नव्हते व आताही
तसे होणार नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
विद्यार्थिनी सज्ञान आहेत
मद्यपानाबद्दल बोलायचे तर येथील सगळ्या मुली या १८ वर्षांच्या वरील आहेत. तरीही त्यांनी काय करावे आणि काय करू नये, याचा आम्ही विचार करून, त्यांच्यावर निर्बंध का लादायचे, असा प्रश्न त्यांनी विचारला. माझ्या वैद्यकीय वसतिगृहापुरतेच मला माहीत आहे की बहुसंख्य मुलींनी पसंती दिली तर शाकाहारी अन्न दिले जाते. इतरांसाठी काही विशिष्ट दिवशी मासांहारी पदार्थ असतात, असे रोयोना सिंग म्हणाल्या.