जलीकट्टूसाठी वटहुकूम नाहीच
By admin | Published: January 20, 2017 05:55 AM2017-01-20T05:55:20+5:302017-01-20T05:55:20+5:30
बंदी असलेल्या जलीकट्टू खेळाचे आयोजन करण्यासाठी तमिळनाडू सरकार केंद्र सरकारच्या पाठिंब्याने लवकरच पावले उचलणार आहे
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- बंदी असलेल्या जलीकट्टू खेळाचे आयोजन करण्यासाठी तमिळनाडू सरकार केंद्र सरकारच्या पाठिंब्याने लवकरच पावले उचलणार आहे, असे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेलवम यांनी गुरुवारी म्हटले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलीकट्टूसंदर्भात वटहुकूम काढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्याने आम्ही लवकरच जलीकट्टू आयोजित करण्याबाबत पावले उचलू. तुम्हाला ती लवकरच दिसतीलही’’, असे पन्नीरसेलवम म्हणाले.
मोदी यांची भेट घेऊन पन्नीरसेलवम यांनी जलीकट्टूचे आयोजन करण्यासाठी वटहुकूम जारी करण्याचे आवाहन सरकारला केले होते. जलीकट्टूवरील बंदी मागे घेण्यात यावी यासाठी संपूर्ण तमिळनाडूत निदर्शने पसरली आहेत.जलीकट्टूबाबत जनतेच्या भावनांचा आदर मी करतो व त्या मला समजल्याही आहेत, असे मोदी म्हणाल्याचे पन्नीरसेलवम यांनी म्हटले.
पन्नीरसेलवम यांनी वटहुकुमाचा आग्रह धरल्यावर मोदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने जलीकट्टूबाबत अद्याप निर्णय दिलेला नाही. परंतु राज्य सरकार जी पावले उचलील त्याला केंद्र सरकार पाठिंबा देईल. जलीकट्टू खेळावरील बंदीच्या निषेधार्थ गुरुवारी येथे तमिळनाडूतून आलेले अनेक लोक दाखल झाले. त्यात विद्यार्थी व वकिलांचा समावेश आहे.
निदर्शनांचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयातील तमिळी वकिलांनी केले. त्यांनी पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट आॅफ अॅनिमल्सच्या (पेटा) विरोधात आणि जलीकट्टूवरील बंदीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तत्पूर्वी, त्यांनी मंडी हाऊसपासून जंतरमंतर रोडवर घोषणा देत मोर्चाही नेला होता. निदर्शकांनी आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचा दावा केला. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पीएमकेचे नेते अंबुमणी रामदास यांनी जलीकट्टूच्या समर्थनासाठी गुरुवारी धरणे धरले. २६ जानेवारीच्या आधी सरकारने वटहुकूम काढावा, अशी त्यांची मागणी आहे. जलीकट्टूच्या समर्थनासाठी राज्यात गुरुवारी तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू होती.
न्यायालय वादापासून दूर
जलीकट्टूचा विषय सर्वोच्च न्यायालयात आला असताना सरन्यायाधीश जे. एस. केहार आणि धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठाने तुमचा प्रश्न मद्रास उच्च न्यायालयाला सोडवू द्या. तुम्ही सर्वोच्च न्यायालयातच का येता, असा प्रश्न विचारला.
> ही तमिळ परंपरा - विश्वनाथ आनंद
जलीकट्टू हा खेळ तामिळनाडूचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, अशा शब्दांत जागतिक दर्जाचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने या खेळाच्या आयोजनाला गुरुवारी पाठिंबा दिला. मी प्राण्यांच्या हक्कांचे समर्थन करतो पण येथे तो मुद्दा नाही. परंपरा आणि उदरनिर्वाहाच्या साधनाचाही मान राखला गेला पाहिजे, असे आनंद टिष्ट्वटरवर म्हणाले.