पटेल समाजासाठी आरक्षण हवेच
By admin | Published: July 16, 2016 02:48 AM2016-07-16T02:48:51+5:302016-07-16T02:48:51+5:30
नऊ महिन्यांच्या बंदिवासानंतर शुक्रवारी तुरुंगाबाहेर येताच पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आंदोलन पुढेही सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला.
सुरत : नऊ महिन्यांच्या बंदिवासानंतर शुक्रवारी तुरुंगाबाहेर येताच पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आंदोलन पुढेही सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला.
गुजरात उच्च न्यायालयाने जामीन दिल्याने हार्दिक यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले. ते म्हणाले की, आपल्या समाजासाठी ‘ओबीसी’ कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आपण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीतील ५६ इंची छातीच्या वक्तव्यावर कोपरखळी हाणताना हार्दिक म्हणाले की, मला उंची, वजन किंवा ५६ इंची छाती नको आहे. मला केवळ माझ्या समाजाचा हक्क हवा आहे. न्यायालयाकडून देशद्रोह आणि विसनगर आमदारांच्या कार्यालयात तोडफोड केल्याशी संबंधित प्रकरणांत जामीन मिळाल्यानंतर पटेल यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. हार्दिकला सहा महिन्यांपर्यंत गुजरातबाहेर राहण्याची अट घातली आहे. हार्दिकला सुटका झाल्यानंतर ४८ तासांत गुजरात सोडावे लागणार आहे. सुरतमध्ये हार्दिकने सर्व पक्षांना या आंदोलनाचा राजकीय लाभ न घेण्याचा इशारा दिला. (वृत्तसंस्था)