भारतीय तरुणांच्या एच वन बी व्हिसामध्ये अडथळे येऊ नयेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 05:17 AM2019-12-21T05:17:24+5:302019-12-21T05:17:33+5:30
एस. जयशंकर; अमेरिकेतील प्रतिनिधींना केले आवाहन
वॉशिंगटन : भारतातून रोजगारांसाठी येणाऱ्या हुशार व प्रतिभावान तरुणांना एच वन बी व्हिसा देण्यात अमेरिकेने अडथळे आणू नये, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयंशकर यांनी येथे केले.
भारत आणि अमेरिका यांच्या आर्थिक सहकार्य असणे गरजेचे आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री म्हणाले की, सहकार्याचा पूल बांधणे गरजेचे आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय तरुणांचे अमेरिकेच्या विकासामध्येही योगदान आहे. त्यामुळे त्यांना नोकरीसाठीचा व्हिसा मिळण्यातील अडथळे दूर होणे आवश्यक आहे.
या एच वन बी व्हिसाच्या आधारेच अमेरिकेतील कंपन्या बहुतांशी भारतीय तरुणांना तिथे रोजगार देऊ शकतात. त्यातून भारतीय तरुणांचा जसा फायदा होतो, तसेच या कंपन्यांनाही कौशल्य असलेले, तसेच प्रतिभावान लोक उपलब्ध होतात. त्यामुळे भारत व चीनमधून हजारो तरुण या नोकऱ्यांसाठी अमेरिकेत जात असतात. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेले हे आवाहन अतिशय महत्त्वाचे आहे.
गेल्या काही वर्षांत अमेरिकन लोकांनाच रोजगार मिळावा, अन्य देशांतील लोकांनी हे रोजगार बळकावले आहेत, असा प्रचार तिथे सुरू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन फर्स्ट ही भूमिकाही तशीच आहे. त्यामुळे एच वन बी व्हिसा मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. दरवर्षी हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जातात आणि मग तिथेच नोकरी करतात, पण नोकरीसाठीचा व्हिसा मिळण्यात अडचणी येत असल्याने तिथे उच्च शिक्षणासाठी जाणाºया भारतीय विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. (वृत्तसंस्था)
प्रमाण कमी करण्याचा विचार
रोजगारासाठी अमेरिकेत येणाºया भारतीय तरुणांच्या व्हिसामध्ये अनावश्यक कायदेशीर अडचणी निर्माण केले जाऊ नयेत, अशी भूमिकाही परराष्ट्रमंत्र्यांनी तेथील विविध बैठकांमध्ये मांडली. भारतीयांच्या एच वन बी व्हिसांचे प्रमाण कमी करण्याचा विचार अमेरिकी प्रशासनाने चालविला आहे. त्याचा परिणाम आयटी क्षेत्रातील भारतीय तरुणांवर होण्याची दाट शक्यता आहे.