काळ्या पैशावरुन लोकसभेत गदारोळ
By admin | Published: November 25, 2014 12:31 PM2014-11-25T12:31:35+5:302014-11-25T12:55:47+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या दुस-याच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी काळा पैशावरुन लोकसभेत गदारोळ घालत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - शारदा चिटफंड घोटाळ्यात खासदार सृंजोय घोष यांना अटक केल्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरु झालेला संघर्ष लोकसभेतही दिसून आला. हिवाळी अधिवेशनाच्या दुस-याच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी काळ्या पैशावरुन लोकसभेत गदारोळ घालत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. विशेष म्हणजे तृणमूलच्या खासदारांना काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनता दल संयुक्त या पक्षांच्या खासदारांनीही साथ दिल्याने लोकसभेत भाजपा सरकारविरोधात विरोधी पक्षाचे खासदार एकटवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी संसदेच्या कामकाजाची सुरुवात होताच तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. तृणमूलचे खासदार 'काळे धन परत आणा' अशा घोषणा लिहीलेल्या काळ्या छत्र्या घेऊन संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ ठाण मांडून होते. यानंतर लोकसभेतील कामकाजाची सुरुवात झाल्यावर तृणमूलचे खासदार लोकसभा अध्यक्षांसमोर येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. अजूनही काळा पैसा परत आणण्यात सरकारला यश येत नसल्याची टीका तृणमूलच्या खासदारांनी केली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गोंधळी खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत काळ्या छत्र्या घेऊन येण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र यानंतर विरोधकांनी एकजूट दाखवत घोषणाबाजी सुरु ठेवल्याने दुपारी बारा पर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुपारी बारानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावर शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न सभागृहासमोर मांडले.
राज्यसभेतही बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केंद्र सरकारने १०० दिवसांत काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन अजूनही पूर्ण केले नाही असे निदर्शनास आणून दिले. तृणमूलच्या खासदारांनी राज्यसभेतही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. हैद्राबादमधील राजीव गांधी विमानतळाचे नामांतर आणि अन्य मुद्द्यांवरुन काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी एकपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.